कोरोनाचे संकट कायम असताना बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात आजपासून एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी आज विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर आज पासून राज्यभरात एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला आहे. आज परीक्षेचा पहिला दिवस असल्याने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्वतः शहरातील कांही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्राच्या ठिकाणी एका वर्गात पावसाच्या पाण्याचा त्रास होत असल्याची तक्रार आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच संबंधित वर्गातील परीक्षार्थींची अन्यत्र दुसऱ्या वर्गात बसण्याची सोय करून दिली.
एसएसएलसी परीक्षा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ती खबरदारी घेण्यात आली. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना फेस मास्क, सॅनिटायझर आणि पिण्याच्या बाटलीसह बिस्किटाचे पुढे देखील देण्यात आले आहेत.
थोडक्यात मुलांना परीक्षेप्रसंगी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक हे जातीने परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी लक्ष ठेवून आहेत.
एकंदर बेळगाव आणि चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये कोरोना संदर्भातील फेसमास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आदी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून एसएसएलसी परीक्षा घेतली जात आहे.