महाराष्ट्रातील पंढरपूर येथील आषाढी वारीला यंदा बेळगाव जिल्ह्यातील वारकरी मंडळींनी दिंडीने जाऊ नये, असे आवाहन बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर आणि जिल्हा दंडाधिकारी, महाराष्ट्र यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रणासाठी येत्या 11 ते 24 जुलै दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी भक्तांना बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर भागात दि. 11 जुलैपासून 25 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलीस कायदा 37 नुसार हा निर्बंध घालण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातून अनेक दिंडी आणि हजारो वारकरी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असतात. चालत, रेल्वेने, बस अथवा खासगी वाहनाने हे सर्वजण पंढरपूरला जातात.
तथापि यंदा कोरोना संक्रमणामुळे आषाढी वारीतील सर्वसामान्यांच्या सहभागावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. याची दखल घेऊन बेळगाव जिल्ह्यातील वारकरी व भाविकांनी सहकार्य करावे आणि सोलापूरला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.