Friday, December 27, 2024

/

पाळेमुळे खणून सायबर फसवणूकितील 10 लाख रुपये केले परत

 belgaum

बेळगाव शहरातील एका मोठ्या सायबर फसवणुकीची पाळेमुळे खणून काढताना बेळगावच्या सीईएन पोलिसांनी एका निवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्याचे सायबर फसवणूकीद्वारे हडप करण्यात आलेले 10 लाख रुपये परत मिळवून दिले असून याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींपैकी प्रमुख सूत्रधार झारखंड येथील असून अन्य दोघे नाशिक येथील आहेत. याबाबतची माहिती अशी की,  कंग्राळी खुर्द येथील निवृत्त बीएसएनएल कर्मचारी यल्लाप्पा नारायण जाधव यांना गेल्या 9 जून रोजी सायबर फसवणूकीद्वारे 10 लाखाला लुबाडण्यात आले होते.

त्यादिवशी अज्ञाताने फोनवर जाधव यांना आपण एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या खात्यातील आरवायसी अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकचा तपशील आवश्यक असल्याने व्हाट्सअपवर त्यांचे फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवून त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगून ओटीपी शेअर करण्याद्वारे यल्लाप्पा जाधव यांच्या खात्यातील 10 लाख रुपये लांबविले होते.

सदर फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच जाधव यांनी लागलीच दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी बेळगाव सीईएन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि पोलिस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आणि फसवणूक झालेले 10 लाख रुपये यल्लाप्पा जाधव यांना परत मिळवून दिले आहेत.

Cyber police station
Cyber police station

या सायबर फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी झारखंडच्या जामतारा जिल्ह्यातील प्रमुख आरोपीसह नाशिक येथील अन्य दोघे अशा एकूण तिघाजणांना गेल्या 15 जुलै रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सायबर फसवणुकीची कबुली दिली. त्यानुसार आरोपींकडून एकूण 12 लाख 56 हजार रुपये जप्त करण्यात आले असून सायबर कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींकडील 5 मोबाईल व 3 डेबिट कार्ड जप्त करण्यात आले असून त्यांनी फसवणुकीसाठी वापरलेली वेगवेगळ्या बँकांची 50 खाती गोठविण्यात आली आहेत.

पोलीस चौकशीत आरोपींनी सायबर फसवणूक करण्यासाठी आत्तापर्यंत 48 मोबाईल आणि 304 सिम कार्डचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांनी बेळगावसह गुलबर्गा, बेंगलोर आणि हैदराबाद येथे देखील सायबर फसवणुकीचे अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव सीईएन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी या सायबर गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.