बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने यंदा 42 कोटींचा अर्थसंकल्प मांडला असून यात विविध विकास कामांचा समावेश आहे. सदरचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी पुणे येथील सदर्न कमांडला पाठवून देण्यात आला असून तो मंजूर होताच विकास कामांना सुरुवात होणार आहे.
कॅंटोनमेंट बोर्डातर्फे दरवर्षी बोर्डाच्या बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येतो. यंदाचा अर्थसंकल्प बोर्डांच्या सदस्यविना मांडण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे बोर्डावर सध्या प्रशासक आहे.
परिणामी बोर्डाच्या बैठकीत लोकनियुक्त सदस्यांविना हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यासंबंधी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान हियरिंग बोलविण्यात येते. यावेळी बेळगावमधील अधिकाऱ्यांना हजर राहून अर्थसंकल्पाची माहिती द्यावी लागते. त्यानंतर अर्थसंकल्प मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होते.
यंदा देखील कोरोना असल्यामुळे हिअरिंग ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मे महिन्यामध्ये बोर्डाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. तो अर्थसंकल्प सुमारे 59 कोटी रुपयांचा होता.
त्यामध्ये कत्तलखान्यावरील सांडपाणी प्रकल्प बरोबर अन्य विकास कामांचा समावेश होता. मात्र कत्तलखान्या वरील सांडपाणी प्रकल्पाची रक्कम 41 लाख रुपये असल्याने हा प्रकल्प रद्द करून इतर विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार विकास कामे झाली आहेत.