कर्नाटकात येडीयुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण यांचे उत्तर मिळाले असून बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.मंगळवारी सायंकाळी बंगळूरू येथील कॅपिटल हॉटेल मध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बसवराज बोंम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी प्रस्ताव ठेवला त्याला सर्वांनी अनुमोदन दिले.
भाजप प्रभारी अरुण सिंह ,धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी दुपारी बोम्मई यांचा शपथविधी होणार आहे.
बोम्मई यांच्या रूपाने उत्तर कर्नाटकाला मुख्यमंत्री मिळाला आहे.मुख्यमंत्री पदी लिंगायत चेहरा असणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या मात्र शेवट आता मुख्यमंत्री म्हणून लिंगायत चेहऱ्याला पुन्हा एकदा भाजपने समोर केला आहे.
बसवराज बोम्मई हे बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्ती आणि हावेरी जिल्ह्यातील शेग्गावचे आमदार आहेत या शिवाय ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कै एस. आर. बोम्मई यांचे सुपुत्र देखील आहेत.
जनता दलमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बसवराज बोम्मई संयुक्त जनता दलात गेले. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटकात सध्या लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे आणि या समाजाचा मुख्यमंत्री करावयाचा झाल्यास बसवराज बोम्मई यांच्यावर हाय कमांडची कृपादृष्टी झाली आहे.
बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्रीपद दिल्याने उत्तर कर्नाटकला आणि लिंगायत समाजाला मुख्यमंत्रीपद मिळाल्यासारखे झाले आहे.