बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप हायकमांडकडून येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण? याचा शोध सुरू असून सध्या गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचे नांव आघाडीवर येत असल्याचे समजते.
बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप हायकमांडकडून येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण? याचा शोध सुरू आहे. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग हे कर्नाटकात दाखल झाले आहेत.
धर्मेंद्र प्रधान देखील येणार असून सध्या आमदारांची मत जाणून घेण्याची कवायत बेंगलोरमध्ये सुरू आहे. एकीकडे भाजप संघटना कार्यदर्शी बी. एल. संतोष आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे नांव चर्चेत असताना पुन्हा एकदा तिसरे नाव आघाडीवर आले आहे ते म्हणजे कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचे होय.
बसवराज बोंम्मई हे बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्ती आणि हावेरी जिल्ह्यातील शेग्गावचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या नांवाला जवळपास पसंती असल्याची माहिती समोर येत आहे. बसवराज हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे सुपुत्र देखील आहेत. बसवराज बोम्मई यांना केंद्रीय हायकमांडकडून कोणता संदेश आला याबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून बोम्मई यांचे पारडे जड मानले जात आहे.
जनता दलमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बसवराज बोम्मई संयुक्त जनता दलात गेले. कालांतराने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटकात सध्या लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे आणि या समाजाचा मुख्यमंत्री करावयाचा झाल्यास बसवराज बोम्मई यांच्यावर हाय कमांडची कृपादृष्टी होईल का? याचीही चर्चा सुरू आहे. बसावराज बोम्माई यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास उत्तर कर्नाटकला आणि लिंगायत समाजाला मुख्यमंत्रीपद मिळाल्यासारखे होणार आहे. त्यामुळे भाजप हायकमांड बोम्माई यांना झुकते माप देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.