भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार 2021 च्या ‘योगासह रहा, घरात रहा’ या घोषवाक्याला अनुसरून तंदुरुस्त निरोगी आरोग्यासाठी आज सोमवारी सकाळी 7 वाजता जागतिक योग दिनानिमित्त ‘मनेइंदले योग’ म्हणजे घरामध्ये योगा हा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याचे मंत्री उमेश कत्ती, खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आदी मान्यवरांसह सर्व लोकप्रतिनिधींनी आज सकाळी आपापल्या घरामध्ये योगासने करून जागतिक योग दिन साजरा केला.
जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी आपल्या निवासस्थानाच्या आवारातील उद्यानाच्या हिरवळीवर योगासने केली. उपरोक्त सर्वांनी ‘मनेइंदले योग’ दृश्य माध्यम कार्यक्रमाव्दारे योगाची प्रात्यक्षिके सादर करून तंदुरुस्त निरोगी आरोग्यासंबंधी जागृती निर्माण केली.