सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियम धाब्यावर बसवून महिला सफाई कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये सुरू आहे मनपा कंत्राटदार आणि मुकादम यांच्या संगनमताने या प्रभागांमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असून याकडे महापालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित कंत्राटदार व मुकादमावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जाते.
महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक प्रभागांमधील स्वच्छतेसाठी 30 ते 35 सफाई कामगारांची नियुक्ती केलेली असते. यामध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. महिला कर्मचारी या रस्त्यावरील केरकचरा काढून एकत्रित करणे तो पुरुष कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करणे हे काम करतात. त्याचप्रमाणे पुरुष कर्मचारी एकत्रित केलेला कचरा गोळा करून तो कचरा वाहूगाडीमध्ये टाकण्याचे काम करतात. थोडक्यात कचरा उचलण्याचे जे अवजड काम आहे ते पुरुष कर्मचारी करतात. मात्र सदर कामासाठी गेल्या दोन महिन्यापासून अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये कंत्राटदार आणि मुकादमाने महिला सफाई कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे.
अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये सध्या पंधरा-वीस महिला सफाई कर्मचारीच स्वच्छतेचे काम पहात आहेत या प्रकारात प्रभागांमध्ये घंटागाडीची देखील सोय नाही त्यामुळे महिला सफाई कर्मचारी कचरा कुंडाच्या ठिकाणचा कचरा गोळा करण्याबरोबरच घरोघरी फिरून गोळा झालेला कचरा कचरा गाडीत भरण्याचे काम करत आहे.
सध्याच्या जीवघेण्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत मदतीला एकही पुरुष माणूस नसताना या महिला गेले दीड-दोन महिने अवरितपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र याच्या मोबदल्यात कंत्राटदार आणि मुकादमाकडून संबंधित महिला सफाई कर्मचाऱ्यांना पगारात कपात आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी हे बक्षीस दिले जात आहे. सरकारच्या नियमानुसार सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून सकाळच्या नाष्ट्यासह सर्व त्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. तथापि अनगोळ प्रभाग क्र. 5 आणि 6 मध्ये याच्या परस्परविरोधी चित्र पहावयास मिळत आहे. याठिकाणी महिला सफाई कर्मचार्याच्या पगारात या ना त्या कारणाने कपात तर केली जातेच, शिवाय त्यांना वेळेवर कामातून मोकळेही केले जात नाही.
सकाळी 6 ते 11 -12 वाजेपर्यंत कामाची वेळ असेल तर संबंधित महिला कर्मचाऱ्यांना दुपारी एक-दीड वाजेपर्यंत राबवून घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार सदर 15 -20 महिला कामगारांकडून स्वच्छतेचे काम करून घेणारा कंत्राटदार महापालिकेकडे मात्र 30 ते 35 कामगारांचा पगार मंजूर करून घेत असल्याचे बोलले जात आहे. थोडक्या पंधरा-वीस जणाना कामाला लावून कामावर नसलेल्या उर्वरित पंधरा -वीस जणांचा पगार परस्पर लाटला जात आहे.
तेंव्हा कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त जगदीश के एच यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदार व मुकादमावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्याय संदर्भात महापालिकेचे पर्यावरण अभियंता आणि स्वच्छता निरीक्षकाकडे तक्रार केली होती.
मात्र या तक्रारीची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित महिला सफाई कर्मचाऱ्यांवर होणारा हा अन्याय त्वरित न थांबल्यास संबंधित सर्व सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन महापालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा गुंजेटकर यांनी दिला आहे.