पावसाळ्याला प्रारंभ झाला असला तरी जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. मात्र हे दृश्य आहे बेळगावच्या न्यू गांधीनगर कॉर्नरचे. या ठिकाणी आकाशात उंच उडणारा हा कारंजा नसून जलवाहिनी फुटल्याने उडालेला पाण्याचा फवारा आहे.
सध्या सरकार तसेच पर्यावरण प्रेमीकडून पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा आणि पर्यायाने देश वाचवण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील न्यू गांधीनगर कॉर्नर येथे आज सकाळी मुख्य जलवाहिनीला गळती लागली आणि पाण्याचा फवारा आकाशात उंच उडू लागला होता.
फुटलेल्या जलवाहिनीतून उडणाऱ्या उंच फवाऱ्यामुळे शेकडो लिटर पाणी क्षणाक्षणाला वाया गेले आहे.
स्थानिक नागरिकांनी महत्प्रयासाने दगड माती धोंडे टाकून सदर पाणीगळती काही अंशी थांबविले असले तरी अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
तरी पाणी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी गांधिनगर कॉर्नर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.