राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा आदेश राज्य शासनाने नुकताच बजावला असून यासंदर्भात आरोग्य व औद्योगिक विभागाने संयुक्त नियोजन करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव असला तरी राज्यात औद्योगिक आस्थापने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि कोरोनाच्या धास्तीने सध्या बरेचसे उद्योग सुरू झालेले नाहीत. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांना कोरोनाची लस देऊन त्यांना भयमुक्त करावे असा शासनाचा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात 45 वर्षावरील कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी व औद्योगिक विभागाचे सहसंचालक यांनी त्यासाठीचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. औद्योगिक आस्थापना जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार नियोजन करून संबंधित औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन तेथील कामगारांना लस देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून लसीकरणाबाबतचे नियोजन करावे. औद्योगिक आस्थापनांची निवड तेथील कोणत्या जागेत लसीकरणाची मोहीम राबविली जावी. किती कामगारांना लस दिली जावी याबाबतचे नियोजन ही आरोग्य अधिकारी व औद्योगिक विभागाच्या सहसंचालकांनी करावे, असेही सांगण्यात आले आहे.
औद्योगिक वसाहतीतील 18 ते 44 वर्षे वयोगटातील कामगारांच्या लसीकरणाबाबत देखील महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यातील या वयोगटातील कामगारांची यादी तयार करण्याची सूचना औद्योगिक विभागाच्या सहसंचालकांना देण्यात आली आहे. शिवाय लसीकरणाबाबतचा अहवाल प्रत्येक दरमहा शासनाकडे पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्याच्या आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर तसेच वाणिज्य व उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजकुमार खत्री यांनी हा आदेश बजावला आहे. त्यामुळे आज सोमवारपासून औद्योगिक कामगारांच्या लसीकरणाबाबतची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.