भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) आपल्या पाच विमानतळांच्या ठिकाणी केलेल्या यशस्वी बिडिंगमध्ये सुदैवाने बेळगाव विमानतळासाठी दोन फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) मंजूर झाले असून वर्षअखेर ते कार्यरत होण्याची शक्यता आहे.
बेळगाव विमानतळासाठी मंजूर झालेल्या फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स पैकी पहिले मेसर्स संवर्धन टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बेंगलोर आणि दुसरे मेसर्स रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दिल्ली यांचे असणार आहे.
मेसर्स संवर्धन टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बेंगलोरच्या एका पथकाने नुकतीच बेळगाव विमानतळावर असणाऱ्या एफटीओच्या जागेला भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.
बेळगाव विमानतळावरील फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्सची स्थापणा आराखडा (डिझाईन), बांधणी, चालवणे, देखभाल आणि हस्तांतराच्या (डीबीओएमटी) आधारावर केली जाणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या एअरपोर्ट एफटीओचे क्षेत्रफळ प्रत्येकी 5000 चौरस फूट इतक असणार आहे. या एफटीओंची भाडेपट्टी प्रति चौरस फुटानुसार आकारली जाणार आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018साली केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी बेळगावला भेटही दिली असता. या ठिकाणी फ्लाईंग स्कूल किंवा अकॅडमी सुरू करण्याची सूचना केली होती.
ज्यामुळे बेळगाव आणि परिसरातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन ते विमान उड्डाण क्षेत्रात कारकीर्द घडवू शकतील असे त्यांनी म्हंटले होते.