रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस घटण्याद्वारे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. मात्र देशात आता तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देण्यात आला असून हा धोका लक्षात घेता आयुष्य मंत्रालयाने लहान मुलांसाठी नवी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. यात योग्य डॉक्टरांच्या उपचारासह योगा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी पालकांनो घाबरू जाऊ नका. मुलांची काळजी घ्या, असे आयुष्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुलांसाठी नवी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे. सदर मार्गदर्शक सूची खालील प्रमाणे आहेत.
1) थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चार ते पाच दिवस ताप कायम राहणे, जेवण कमी होणे आणि चिडचिड होणे अथवा ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्याहून कमी झाल्यास डॉक्टरांना दाखवा. 2) मधुमेह, हृदय, फुप्फुसाचा आजार असणाऱ्या मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका. 3) नवजात बालकाला आईचेच दूध गरजेचे आहे. 4) मुलांना हात स्वच्छ धुवायला सांगा, घराबाहेर पडताना फेसमास्क आवश्यक. 5) दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुले कटाक्षाने फेसमास्क लावतील यावर पालकांनी लक्ष ठेवणे. 6) मुलांसाठी नॉन मेडिकल किंवा तीन लेअरचा सुती कपड्याचा मास्क योग्य. 7) गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नका. 8) मुलांना व्हिडिओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातून इतरांच्या संपर्क ठेवा. 9) कोरोनाची लक्षणे जाणवल्यास मुलांना वृद्धांपासून दूर ठेवा. 10) मुलांकडून योगा करून घ्या.
केंद्र सरकारने संक्रमित लहान मुलांच्या उपचारासाठी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यात म्हंटले आहे की मुलांना स्टेरॉईड देणे टाळायला हवे, तसेच मुलांच्या शारीरिक क्षमतांचे आकलन करण्यासाठी सहा मिनिटे चालण्याचा सल्ला दिला आहे. मार्गदर्शक सूचीमध्ये रेमडेसिव्हिरचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ते फक्त गंभीर रुग्णाला दिले जात असल्यामुळे रेमडेसिव्हिरच्या वापरापासून दूर राहावे. रेमडेसिव्हिर आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेले औषध आहे. रेमडेसिव्हिर संबंधी 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर याचा प्रभाव आणि सुरक्षा याचा डेटा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे ज्या मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा अस्थमा आहे, त्यांच्यासाठी याचा वापर पूर्णपणे टाळावा.