शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला आहे.
बेळगाव डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनच्या पदाधिकारी सुभाष इनामदार यांनी आज पत्रकार परिषदेत उपरोक्त इशारा दिला. इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आर्थिक चलनवलन बंद झाल्याने विज बिल भाडे वैयक्तिक खर्च बँकेचे कर्ज आणि थकबाकी यांची तोंडमिळवणी करताना या दुकानदारांना नाकीनऊ येत आहेत. पुस्तक विक्री आणि स्टेशनरी दुकानदार सरकारी कर नियमीत भरत असले तरी त्यांना सरकारकडून कोणतेही फायदे मिळालेले नाहीत.
बांधकाम उद्योग, उद्योगधंदे, विविध सरकारी कार्यालय सध्या खुली असून त्यांना कागद, पेन, पेन्सिल आदी साहित्याची गरज असते. त्यामुळे पुस्तक विक्री आणि स्टेशनरी दुकाने ही अत्यावश्यक बाबींमध्ये मोडली पाहिजेत. शाळा आणि महाविद्यालयांनी यापूर्वीच ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरू केली आहे.
त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांना पुस्तकांची तसेच संबंधित अन्य साहित्याची अत्यंत गरज असल्यामुळे संबंधित साहित्य अत्यावश्यक समजले गेले पाहिजे. सर्व शाळा महाविद्यालयांनी त्यांच्या आवारामध्ये विक्री व्यवसाय सुरू करण्यापेक्षा बाजारपेठेत जाऊन पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सूचना दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावाने निर्माण केलेल्या संकटावर मात करण्यासाठी सरकारने सर्व व्यवसायांना विशेष पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. तशी वीज बिल, विविध कर आणि बँकेच्या कर्जामध्ये देखील सवलत दिली जावी.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार केला जावा. तसेच येत्या सोमवार दि 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला आहे. पत्रकार परिषदेस मकरंद केशकामत, दुंडाप्पा जिगजिनी, शेष जवळकर आदी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.