गेल्या मंगळवारी मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले असून स्मार्ट सिटी च्या अर्धवट कामामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच गांधीनगरसह ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत
यावर्षी वेळेत हजेरी लावणाऱ्या मान्सूनच्या पावसाला मंगळवारी रात्री प्रारंभ झाला. काल बुधवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. गांधीनगर येथील अशोक चौक येथील रस्त्यावर पाण्याचे मोठे तळे साचून रस्ता अदृश्य झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालक आणि सायकल स्वारांना रस्त्यावरील पाण्यातून जपून मार्गक्रमण करावे लागत होते.
गांधीनगरप्रमाणे शहरातील अनेक रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी तुंबले आहे. त्यामुळे या तुंबलेल्या गढूळ पाण्यातून एखादे वाहन भरधाव वेगाने गेल्यास लाॅक डाऊनमुळे सकाळी खरेदीस बाहेर पडलेल्या नागरिकांचे कपडे रंगून जाण्याचे प्रकार घडत आहेत.
काल बुधवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्यामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात अडवून बऱ्याच ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही ठिकाणी तर प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्यांचा अक्षरशा खच पडला होता आणि त्यामधून वाट काढताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागत होती.
शहरामध्ये स्मार्ट सिटीची कामे अर्धवट आहेत. खोदाई करून ठेवलेल्या कामाची माती रस्त्यावरच पडून असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.