बेळगावचा शिवसेना आरोग्य कक्ष आणि ठाणे -मुंबई येथील शिवसेना आरोग्य कक्ष यांच्या माध्यमातून मुंबई येथे यशस्वीरित्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे बेळगावच्या एका 3 महिन्याच्या बालकाचे प्राण वाचून त्याला जीवदान मिळाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळचे चंदगड येथील रहिवासी असणारे शशिकांत वाके आणि त्यांची पत्नी सारिका वाके हे उभयता शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथे राहतात. शशिकांत वाकी हे ठाण्याला कामाला आहेत. तीन महिन्यापूर्वी सारिका प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. मात्र जन्मानंतर मुलाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे वाके दाम्पत्याने बेळगावातील दोन-तीन डॉक्टरांकडे जाऊन आपल्या चिमुकल्या मुलाची तपासणी करून घेतली.
तपासणीअंती जवळपास सर्वच डॉक्टरांनी मुलाच्या हृदयाच्या नसांमध्ये अडथळा अर्थात दोष असल्याचे सांगून बेळगावात सोय नसल्यामुळे त्याच्यावर मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला.
वाके दाम्पत्याची घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मुलाला मुंबईला घेऊन जाऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करून घेणे याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. त्यामुळेच शशिकांत वाके यांनी बेळगावच्या शिवसेना आरोग्य कक्षाकडे मदत मागितली. तेंव्हा आरोग्य कक्षाचे प्रमुख दत्ता जाधव यांनी वाके यांच्याकडून तसेच मुलाला तपासलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधून एकंदर परिस्थिती जाणून घेतली.
तसेच तात्काळ मदत कार्य हाती घेताना त्यांनी ठाणे मुंबई येथील शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून मुंबई येथे वाके यांच्या मुलावर उपचाराची सोय करावी अशी विनंती केली. त्यानुसार चिवटे यांनी हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील तीन -चार हॉस्पिटलची नांवे सुचविली. त्यापैकी हाजीअली सर्कल, मुंबई येथील एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.
यासाठी बेळगाव शिवसेनेची अत्याधुनिक ॲम्बुलन्स मोफत उपलब्ध करून देण्यात आली. राजू तुडयेकर, निलेश इंगळे आणि विनायक जाधव या शिवसैनिकांनी सदर ॲम्बुलन्समधून वाके यांच्या मुलाला मुंबईला नेऊन हॉस्पिटलमध्ये सुखरूप दाखल केले. गेल्या शुक्रवारी 26 जून रोजी सदर 3 महिन्याच्या बालकावर यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. सध्या त्या बाळाला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान हॉस्पिटलचे बिल 4 लाख 40 हजार रुपये इतके आल्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेनेने मदतीचा हात दिला.
शिवसेनेच्या ठाणे आरोग्य कक्षाने वाके यांच्याकडून फक्त 1 लाख रुपये भरून घेतले आणि उर्वरित रक्कम विविध योजना अंतर्गत हॉस्पिटलमध्ये जमा करून बिलाची पूर्तता केली. या पद्धतीने आपल्या मुलाचा प्राण वाचविल्याबद्दल शशिकांत वाके आणि सारिका वाके यांनी ठाणे आणि बेळगाव शिवसेनेला शतशः धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. या आदर्शवत कार्याबद्दल बेळगावच्या शिवसेना आरोग्य कक्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.