बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाचे अर्ध्यावर थांबलेले काम त्वरित हाती घेतले जावे, या सुशोभीकरण समितीच्या मागणीची दखल घेऊन येत्या सोमवारपासून कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिले आहे.
शिवसेनेने मनपा आयुक्तांना निवेदन देत अर्ध्यावर थांबलेले काम सुरू करा अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याची दखल उत्तर आमदार बेनके यांनी घेत काम सोमवार पासून सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर आणि प्रवीण तेजम यावेळी उपस्थित होते
तत्पूर्वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण समितीची बैठक काल शुक्रवारी सायंकाळी चव्हाट गल्ली येथे संपन्न झाली. बैठकी वेळी सुशोभीकरण समितीचे सरचिटणीस प्रसाद मोरे यांनी मागील वर्षाचा सुशोभीकरणचा आढावा घेतला.
उपाध्यक्ष श्रीनाथ पवार यांनी अनुमती दिली. त्यानंतर सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सुशोभीकरणाची माहिती देतेवेळी गेल्या वर्षी 6 जून रोजी बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुशोभीकरनास सुरवात करण्यात आली होती.
मात्र कांही काळाने शासकीय व तांत्रिक कारणामुळे तसेच कोरोना महामारीमुळे सुशोभीकरणाचे काम थांबले होते. त्यासाठी आजपर्यंत पाठपुरावा केला असता महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून सुशोभीकरणाचे काम थांबल्याचे समजते, असे जाधव यांनी सांगितले.
त्यासाठीच सुशोभीकरण समितीने आज शनिवारी सकाळी आमदार ॲड. अनिल बेनके यांची भेट घेऊन सुशोभिकरनाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. आमदारांनी मागणीची दखल घेऊन येत्या सोमवारपासून कामास सुरवात होईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे, उपाध्यक्ष श्रीनाथ पवार, आकाश धुराजी, परशराम झेंडे, चंद्रकांत माळी, धनंजय मोरे, राजन जाधव आदी उपस्थित होते.