कोरोनामुळे बेळगाव शहर परिसरातील अनेक कुटुंबांची वाताहत झाली. अनेक जण बेघर झाले, तर अनेक जण अनाथ. सरकारच्या सर्वेक्षणानुसार कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील जवळपास 720 बालके अनाथ झाली आहेत. असाच प्रसंग महाद्वार रोड येथील प्रसिद्ध मेकॅनिक नागेश ठुम्बरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर ओढवला आहे. कोरोनाने नागेश यांच्या स्वरूपात कर्ता पुरुष हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू आहे.
कोरोनाने निधन झालेल्या मेकॅनिकल नागेश मेस्त्रींच्या कुटुंबाला 1 लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करत बेळगावातील शिवसंदेश मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाद्वार रोड येथे गॅरेज चालवणाऱ्या नागेश ठुम्बरे या मेकॅनिकचे निधन झाल्याने कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. त्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची बनली आहे. अशा परिस्थितीत मयत नागेश यांचे मित्र असलेले शिवसंत संजय मोरे यांच्या प्रयत्नातून शिवसंदेश मित्र परिवाराने पुढाकार घेत या पीडित कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. शिवसंत संजय मोरे यांच्या पुढाकाराने शिवसंदेश भारत समूह आणि मित्र परिवारातर्फे सुप्रसिद्ध मेकॅनिक कै. नागेश सिद्राय ठुम्बरे यांच्या पत्नी आणि मुलांना सुकर भविष्यासाठी आज भरीव आर्थिक मदत देण्यात आली.
कै.नागेश हे महाद्वार रोड येथे गॅरेज चालवून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करत होते. त्यांचे गेल्या 24 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पत्नी नीलिमा यांच्यावर मुलगी दिव्या आणि गौतमी या दोन मुलींची शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी पडली आहे. अशा वेळी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. दिव्या आणि गौतमी यांच्या नांवे कांही रक्कम ठेव म्हणून ठेवून उर्वरित रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
कॉलेज रोडवरील शिवसंत संजय मोरे यांच्या यश ऑटो शोरूममध्ये आज सायंकाळी आयोजित कै. नागेश ठुम्बरेयांच्या शोकसभेप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. शोकसभेच्या प्रारंभी संजय मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उद्योजक महादेव चौगुले, उद्योजक राजेंद्र मुतगेकर, ॲड. सुधीर चव्हाण, शिक्षक रणजित चौगुले यांचीही समयोचित श्रध्दांजलीपर भाषणे झाली.
प्रारंभी मेकॅनिक कै. नागेश सिद्राय ठुम्बरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्याद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेला उपस्थित असलेल्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर शिवसंदेश भारत समूह आणि मित्र परिवारातर्फे दिवंगत नागेश ठुम्बरे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या फिक्स डिपॉझिटची पावती त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली. शोकसभेस उद्योजक महादेव चौगुले, राजेंद्र मुतगेकर, डी. बी. पाटील, ईश्वर लगाडे, एम. वाय. घाडी,गणेश दद्दीकर सुजित कल्याणराव मोरे नारायण कणबरकरहेमंत भोसले संदीप तरळे
प्रवीण मोरे एम के पाटील सरसुभेदार धनंजय मोरेआदींसह शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, नागेश ठुम्बरे यांचा मित्रपरिवार आणि ठुम्बरी कुटुंबाचे हितचिंतक उपस्थित होते.
सूत्रसंचालन सीमा कवी रवी पाटील यांनी केले.
समाजातील दानशूर व्यक्तींनी आधारवड हरपलेल्या या पीडित कुटुंबाला मदत करण्यासाठी +917829634817 संपर्क करा असे आवाहन शिवसंदेश भारत ग्रुप मित्र परिवाराने केले आहे.