मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनासंदर्भातील सध्याचा लाॅक डाऊन 11 जिल्ह्यांमध्ये 21 जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगून 14 जूनपासून उर्वरित जिल्ह्यामधील लाॅक डाऊन शिथिल केला जाईल, असे गुरुवारी स्पष्ट केले आहे.
राज्यातील ज्या 11 जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे, त्यामध्ये बेळगावचा देखील समावेश आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केलेल्या वाढीव लॉक डाऊनच्या आपल्या आदेशाच्या प्रतीमध्ये एक नवी ओळ समाविष्ट केली आहे.
‘ज्या गोष्टींना तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची रितसर परवानगी असेल अशा गोष्टींनाच लॉक डाऊन काळात मुभा असेल,’ अशी ती ओळ आहे. या परवानगी असलेल्या गोष्टींमध्ये कृषी क्षेत्राची गरज असलेल्या बियाणे आणि खतांसह डीआयसीची परवानगी असलेल्या उद्योगांचा समावेश आहे.
सध्या लॉक डाऊनचे जे नियम आहेत तेच 21 जून पर्यंतच्या वाढीव लॉक डाऊनसाठी लागू असणार आहेत. त्यामुळे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जीवनावश्यक साहित्य खरेदीस परवाणगी असणार आहे.
त्यानंतर आपत्कालीन सेवा आणि लसीकरण वगळता सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या संचारावर बंदी असणार आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती वगळता लॉक डाउनच्या काळात नागरिकांसह खासगी वाहनांसाठी संचारबंदी असेल. एखादे पार्सल आणण्यासाठी किंवा टेकअवेसाठी नागरिकांना पायी जाण्यास परवानगी असेल. तथापि हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींच्या कर्मचाऱ्यांना होम डिलिव्हरीसाठी वाहने वापरता येतील.
इतर जिल्ह्यात प्रमाणे 14 जूननंतर बेळगाव जिल्ह्यात देखील इतर सर्व दुकाने उघडतील असे बऱ्याच जणांना वाटत आहे. परंतु तसे कांहीही होणार नाही. फक्त सध्या जी जीवनावश्यक साहित्याची दुकाने सुरू आहेत त्यांचा कालावधी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढविला जाईल एवढेच.
या व्यतिरिक्त राज्यातील वीकेंड आणि नाईट कर्फ्यूचा नियम लागूच राहणार आहे. एकंदर सध्या बेळगावकरांनो घरी रहा, सुरक्षित रहा, हे दिवस ही एक दिवस जातील, एवढेच आपण म्हणू शकतो.