कोरोना प्रादुर्भावाच्या प्रकोपामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आपल्या जिवाभावाच्या लोकांना गमावला आहे. खानापुरातही अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून येथील एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच आईने देखील आपला प्राण सोडला आहे. या घटनेने खानापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खानापुरातील ढोर गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम जिणाजी बिरसे (वय 38) यांचे बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी निधन झाले, तर रविवारी सकाळी त्यांच्या आई चंद्राबाई यांचेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे बिरसे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंद्राबाई यांना पंधरा दिवसापूर्वी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आईची शुश्रुषा करण्यासाठी मुलगा परशराम यांना दवाखान्यात ये-जा करावी लागली. त्यानंतर ते अचानक आजारी पडले आणि शनिवारी दुपारी सिव्हीलमध्ये उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावत प्राणज्योत मावळली.
आईच्या उपचारासाठी धडपडणार्या लेकाचाच आधी मृत्यू झाल्याने बिरसे कुटुंबीय दुःख सागरत बुडाले. मात्र मुलगा वारल्याचा धक्का मनाला लावून घेतील या भीतीने परशराम यांच्या निधनाची माहिती चंद्राबाई यांना देण्यात आली नाही. तरीही दररोज विचारपूस करण्यास येणारा मुलगा नजरेआड झाल्याने चंद्राबाई यांनी हताशपणे आजारांविरुद्ध लढण्याची जिद्द सोडली.
अखेर रविवारी सकाळी त्यांनीही जगाचा निरोप घेतला. परशराम हे खानापूर शहरात गोल्ड लोनचा व्यवसाय करत होते. समाज कार्यात देखील ते अग्रेसर होते. दोन दिवसात बिरसे मायलेकाचा मृत्यू झाल्याने खानापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.