भारत सरकारकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांनाच केंद्र सरकारकडून मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोरोना योद्धे आणि 45 वर्षावरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती, तर राज्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत लसीकरण करणार होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षावरील सर्वांचेच लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे.
देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. या घोषणेनुसार येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकारकडून मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरण्यासाठी दमडीही खर्च करावी लागणार नाही.
जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी की राज्य सरकारांची होती. मात्र आता ती जबाबदारी देखील भारत सरकार घेईल. येत्या दोन आठवड्यात त्याअनुषंगाने यंत्रणा कार्यान्वित होईल.
या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण उत्पादनापैकी 75 टक्के लस खरेदी करून ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.