बेळगाव येथील मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूमच्यावतीने फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या मार्फत आज खानापूर तालुक्यातील जंगल प्रदेशात असलेल्या मूडगई आणि चिरेखाणी गवळीवाडा येथील गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव आणि नुकत्याच समाप्त झालेल्या लाॅक डाऊनमुळे दूर जंगल प्रदेशातील रहिवाशांचे जीवनावश्यक साहित्य अभावी होणारे हाल लक्षात घेऊन बेळगावच्या मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूमच्यावतीने फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या मार्फत आज खानापूर तालुक्याच्या जंगल प्रदेशातील मूडगई खेडेगाव आणि चिरेखाणी गवळीवाडा येथील एकूण 60 गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
यामध्ये 400 हून अधिक लोकसंख्येच्या मूडगई खेडेगावातील सर्व 40 कुटुंबांचा आणि सुमारे 150 लोकसंख्या असलेल्या चिरेखाणी गवळीवाडा येथील 20 कुटुंबांचा समावेश आहे. मूडगई गाव हे जांबोटी बस स्थानकापासून 5 कि. मी. अंतरावर आणि तेथून चिरेखाणी गवळीवाडा 6 कि. मी. अंतरावर आहे. या पद्धतीने मलबार गोल्ड अँड डायमंड्स आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांना एकूण 11 कि. मी. आत जंगलातील कच्च्या रस्त्याने चालत जाऊन जीवनावश्यक साहित्याचे वाटप करावी लागली.
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून पार पडलेल्या या उपक्रमाप्रसंगी मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूम बेळगावचे सहाय्यक संचालक सवाद एम. डी., स्टोअर मॅनेजर सुरज अणवेकर, आनंद बुलबुले, चेतन कांबळे, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, अर्जुन गावडे, मूडगई गावातील प्रमुख ग्रा. पं. सदस्य वंदना विठ्ठल हणबर, शांताराम भरणकर, संभाजी नेवरेकर, नैनेश्वर उसगावकर,
चिरेखाणी गावचे प्रमुख ग्रा. पं. सदस्य शिवाजी हणबर, विठ्ठल हणबर, इराप्पा हणबर, नारायण हणबर, निंगाप्पा हणबर आदींसह गावकरी उपस्थित होते. जीवनावश्यक साहित्याच्या मदतीबद्दल या सर्वांनी मलबार गोल्ड अँड डायमंड्स आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे आभार मानले.