बेळगाव महापालिकेच्या बांधकाम आणि महसूल विभागाकडून संयुक्तरीत्या शहरातील उद्याने तसेच उद्यानासाठी राखीव जागेतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली बजावलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून बेळगाव दक्षिण व उत्तर विभागात एकाच वेळी हे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.
पहिल्या टप्प्यात उद्याने व उद्यानासाठी राखीव जागेतील अतिक्रमण शोधून ते हटविले जाणार आहे. त्यानंतर शहरातील रस्ते, खुल्या जागा व नाले या ठिकाणचे अतिक्रमण शोधून ते हटविले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात महापालिकेने ही अतिक्रमण विरोधी मोहीम उघडली असून पहिल्या टप्प्यात केवळ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याबाबत गुप्तता बाळगली जात आहे. महापालिकेने शहरात उद्यानांसाठी कांही जागा राखीव ठेवल्या आहेत, तर काही जागांमध्ये उद्यानांची निर्मिती केली आहे.
खुल्या जागांची माहिती महसूल विभागाकडून घेण्यात येऊन त्या जागा अस्तित्वात आहेत की तेथे अतिक्रमण झाले आहे याचे सर्वेक्षण केले जात आहे. कांही ठिकाणी उद्यानातच अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी असल्यामुळे माहिती घेऊन ती अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. यासंदर्भात महसूल व बांधकाम विभागाची अनौपचारिक बैठक कांही दिवसापूर्वी झाल्याचे समजते.