बेळगाव जिल्ह्यातील अति कुपोषित बालकांच्या सुदृढ विकासासाठी वसुमारे 18 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून मुलांच्या पौष्टीक आहारासह सर्वंकष विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच दिली.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी देखील महिला व बालकल्याण विभागाने घेतली असून त्यांची यादी व तपशील संग्रहित केला जात आहे. आता गंभीर आजारी कुपोषित बालकांच्या सर्वंकष विकासाला हातभार लावला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील अति कुपोषित मुलांच्या यादीमध्ये यंदा 916 मुलांचा समावेश करण्यात आला आहे. या मुलांना नियमीत आहार पुरवठा, वैद्यकीय उपचार आणि सकस आहार पुरवठ्याकरिता बेळगाव जिल्ह्यासाठी 18 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 2020 -21 या वर्षासाठी मंजूर निधीपैकी 18 लाख 4 हजार 400 रुपये खर्च झाले असून 23 हजार 600 रुपये अद्याप शिल्लक आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 2020 -21 या वर्षात 1,077 मुले कुपोषित आढळून आली असून त्यापैकी 916 मुले अति कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या बालकांसाठी विशेष अनुदान मंजूर झाले आहे.
दरम्यान, 2020 -21 मध्ये एक दिवस ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 लाख 66 हजार 445 मुलांचा समावेश होता. यातील 1,077 मुले कुपोषणग्रस्त असल्याचे निदान झाले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित विकसित झाली नसून वजन देखील कमी असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यासाठीच वरील प्रमाणे 18 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.