कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी सकाळी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील चेकपोस्टला भेट दिली.
शेजारील महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असणे अनिवार्य असणार आहे. तेंव्हा हे प्रमाणपत्र असलेल्यांनाच जिल्ह्यासह राज्यात प्रवेश दिला जावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्टपणे बजावले. तसेच एक वेळ कर्नाटकातील रहिवाशांचे महाराष्ट्रातून आगमन होत असेल तर चेकपोस्टवर त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना आरटी -पीसीआर तपासणीसाठी धाडण्यात यावे.
तपासणी अहवाल येताच तात्काळ संबंधित व्यक्तीला त्याची माहिती द्यावी. तसेच त्याचा तपासणी अहवाल त्याच्या पत्त्यावर धाडण्यात यावा, अशी सूचना त्यांनी चेक पोस्टमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली.
परराज्यातून येणाऱ्या राज्यातील स्थानिक प्रवाशांच्या कोरोना तपासणीसाठी चेकपोस्टच्या ठिकाणी तपासणी केंद्र स्थापून त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले जावेत, अशी सूचना देखील जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. यासाठी सीमावर्ती भागातील चेकपोस्टनी अत्यंत सतर्कतेने काम करावे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संपूर्ण माहिती घेतली जावी, असे त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी चिक्कोडी उपविभागीय अधिकारी युकेश कुमार, चिकोडी अप्पर जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, निपाणी तहसीलदार तसेच इतर खात्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.