शहरातील कांही व्यापारी आस्थापनांच्या फलकांवर चुकीचा पत्ता लिहिल्याबद्दल महापालिकेने संबंधित मालकांना नोटीस बजावली असून फलकावरील पत्ता तातडीने बदलावा अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. नोटीस बजावल्यानंतर आस्थापनांच्या मालकांकडून कार्यवाही झाली की नाही? हे तपासण्यासाठी महापालिकेकडून पाहणीही केली जाणार आहे.
सिव्हील हॉस्पिटल समोरील रस्त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यात आले आहे. तथापि या रस्त्यावरील बहुतांश आस्थापनांच्या फलकांवर सिव्हिल हॉस्पिटल रोड असा उल्लेख करण्यात आला आहे. तो उल्लेख काढून टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड असा उल्लेख करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी नुकतीच तशी नोटीस बजावली आहे. महापालिकेने गेल्या 30 मे 2020 रोजी देखील डॉ. आंबेडकर रोडवरील आस्थापनांना नोटीस बजावून फलकांवरील पत्ता बदलण्यासाठी तीन दिवसाची मुदत दिली होती. मात्र त्या मुदतीत फलकांवरील पत्ता बदलण्यात आलेला नाही. महापालिकेनेही गतवर्षी याबाबत पाठपुरावा केला नव्हता. त्यामुळे तेथील व्यापारी देखील निर्धास्त होते. पण आता पुन्हा फलकावरील पत्त्या बाबत तक्रार दाखल झाल्याने महापालिकेने पुन्हा नोटीस बजावली आहे. मागील वेळी बजावलेल्या नोटीसचा संदर्भ देण्यात आला असून हयगय चालणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
चन्नम्मा चौक ते कोल्हापूर सर्कल पर्यंतचा हा रस्ता अनेक वर्षापासून सिव्हील हॉस्पिटल रोड म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व त्यांचा पुतळा असल्याने सिव्हिल हॉस्पिटल रोडचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करण्यात आले आहे. या रोडवर अनेक व्यापारी आस्थापने व नवे मॉल तयार झाले आहेत. हा रोड शहरातील व्यापारी केंद्र बनला आहे. परंतु त्या रस्त्याचा उल्लेख करताना किंवा फलकांवर पत्ता लिहिताना सिव्हील हॉस्पिटल रोड असाच केला जातो. याला बेळगावातील विविध दलित संघटनांनी सातत्याने आक्षेप घेतला आहे.