लाॅक डाऊनमुळे बेळगावमध्ये अडकून पडलेल्या राजस्थानमधील उंटांच्या तांड्यातील नऊ उंटांपैकी अशक्त झालेल्या एका उंटाचा आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला.
राजस्थानमधून नऊ उंट घेऊन मध्यप्रदेशातील कांही तरुण लाॅक डाऊन पूर्वी बेळगाव शहरात दाखल झाले होते. लाॅक डाऊनमुळे सध्या ते बेळगावात अडकून पडले असून हिंडाल्को नजीकच्या पुलाखाली त्यांचे वास्तव्य आहे. पुरेसा चांगला चारा मिळत नसल्याने त्यांच्या उंटांची परवड होत असून कांही उंट आजारी पडले आहेत. आजारी उंटांपैकी एकाच्या नाकात किड पडल्याने काल हा माझा धर्म पशु बचाव दलाच्या सदस्यांनी काकती पशुवैद्यकीय चिकिस्ता केंद्राच्या सहकार्याने त्याच्यावर तातडीने उपचार केले होते. वेळेअभावी वेळेअभावी काल पशुवैद्य डॉ. चंद्रू यांना अन्य आजारी उंटांवर उपचार करता आले नाहीत.
दरम्यान, आज सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास आजारी उंटांपैकी अशक्तपणामुळे एका उंटाचा मृत्यू झाला. तेंव्हा हा माझा धर्म संघटनेचे प्रमुख विनायक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलामुद्दीन शहा आणि आशिष कोचेरी या पशू बचाव दलाच्या सदस्यांनी तात्काळ हिंडाल्को नजीकच्या पुलाच्या ठिकाणी जाऊन मदत कार्य हाती घेतले.
त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मृत उंटाला हिंडाल्को फॅक्टरी नजीकच्या माळरानावर नेऊन त्या ठिकाणी त्याचे दफन केले. मिळालेल्या माहितीनुसार चांगल्या चाऱ्या अभावी सतत एरंडेल वनस्पतीचा चारा खावू घातला जात असल्यामुळे तांड्यामधील ऊंट आजारी पडत आहेत. त्यामुळे पशुवैद्यांनी एरंडेलची पाने उंटांना खावयास देऊ नयेत असा सल्ला उंट मालकांना दिला आहे.