विदेशात नोकरीला असणाऱ्या युवकाने आपल्या पहिल्या पगारातील काही रक्कम बेळगावात कोरोना मदतीसाठी देऊन माणुसकी जपली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मातृभूमीच्या ऋणाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपताना जर्मनीत नोकरी करणाऱ्या गाडेमार्ग शहापूर येथील सौरभ माळवी या युवकाने युवासेना बेळगाव या संघटनेला त्यांच्या मोफत अन्नदानाच्या उपक्रमासाठी आपल्या विदेशातील पहिल्या पगारातून आर्थिक मदत देऊ केली आहे.
गाडेमार्ग शहापूर येथील सौरभ उदय माळवी हा युवक चार महिन्यापूर्वी बेंगलोर येथील नामांकित कंपनीमध्ये कामाला होता. अलीकडेच तो जर्मनीमधील म्युनिच शहरात एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला लागला आहे.
युवासेना बेळगाव ही संघटना गेल्या जवळपास दीड महिन्यापासून कोरोनाग्रस्त रुग्ण त्यांचे नातलग तसेच रस्त्यावरील गरीब गरजू लोकांना मोफत भोजन वितरित करण्याचा उपक्रम राबवत आहे. सदर संघटनेतर्फे दररोज सुमारे 500 लोकांना या पद्धतीने भोजन पुरविले जाते.
जर्मनीमध्ये कामाला असणाऱ्या सौरभ माळवी याला सोशल मीडियावर बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून युवासेना बेळगावच्या या उपक्रमाची माहिती मिळताच त्याने आपल्या विदेशातील पहिल्या पगारातील काही रक्कम सदर उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार याने आपला भाऊ गणेश माळवी याच्याकडे संबंधित रक्कम पाठवून दिली. गणेश याने आज सोमवारी दुपारी युवासेना बेळगावचे गौरांग गेंजी आणि विनायक हुलजी यांच्याकडे सौरभने पाठवून दिलेली आर्थिक मदत सुपूर्द केली.
याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल शिवसेनेचे दत्ता जाधव, सागर पाटील, नील तवणशेट्टी, संकेत लोहार, शिवम हुलजी, आदित्य तिरवीर, बाबाजी मेणसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जर्मनीसारख्या परदेशात असून देखील आपल्या मातृभूमीबद्दलची आत्मियता आणि शहरवासीयांच्या काळजी पोटी सौरभ माळवीने आपल्या परीने जी मदत केली त्याबद्दल युवा सेना बेळगावने त्याचे आभार मानले आहेत. दरम्यान, सौरभ माळवीने केलेल्या या मदतीची सर्वत्र प्रशंसा होत असून सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता परदेशात नांव आणि पैसा कमावण्यास गेलेल्या अन्य बेळगाववासियांनी सौरभचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आपण कितीही मोठा झालो तरी आपल्या गावाला,गल्लीला विसरू नये हेच सौरव ने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.