आरोग्य खात्याने विधानसभा मतदारसंघ निहाय लसीकरणाची आकडेवारी प्रसिद्ध केली असून बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघ लसीकरणात सर्वात आघाडीवर आहे. आमदार ॲड. अनिल बेनके यांनी लसीकरणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यामुळेच उत्तर मतदारसंघ लसीकरणात आघाडीवर पोहोचला आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघातील 57,533 नागरिकांना पहिला डोस तर 20114 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी जातीने लक्ष देऊन आपल्या मतदार संघातील प्रत्येक गल्लीमध्ये लसीकरण मोहीम राबविली आहे त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा मतदारसंघ लसीकरणात आघाडीवर पोहोचला आहे.
बेळगाव शहराचा एक भाग असलेल्या बेळगाव दक्षिण मतदारसंघातही जास्त लसीकरण झाले आहे. या मतदारसंघातील 50,143 नागरिकांना पहिला डोस तर 11,359 नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. येथील आमदार देखील सक्रिय असल्यामुळे तेथे ही लसीकरण वाढले आहे.
सर्वात कमी लसीकरण अरभावी मतदारसंघात झाले असून येथे 27,474 नागरिकांना लसीचा पहिला डोस तर केवळ 4499 नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. भालचंद्र जारकीहोळी हे या मतदारसंघाचे आमदार असून ते माजी मंत्री आहेत. तथापि लसीकरणात त्यांचा मतदार संघ मागे पडला आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघ लसीकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा मतदार संघ मोठा असल्यामुळे येथील आमदार आपल्या मतदार संघासाठी जास्त लस मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी 47,692 नागरिकांना पहिला डोस तर 6,691 नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे.
जानेवारी ते एप्रिल या काळात जिल्ह्यात पुरेशी लस असताना लस घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले नव्हते. परंतु मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली. नेमकी त्याच वेळी लसीचा तुटवडा निर्माण झाला.
आता सर्व आमदारांना देखील लसीकरणाचे महत्त्व कळले असून ते लस घेऊन लोकांपर्यंत जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे आमदार लसीकरण मोहिमेत सक्रिय झाले आहेत यासाठी गल्लोगल्ली गावोगावी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत आमदारांना मधील या स्पर्धेत मागे राजकारण असल्याची टीका होत असली तरी आरोग्य विभाग मात्र यामुळे तत्पर झाला आहे