कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शहरातील एका व्यक्तीला चुंबकीय शक्ती प्राप्त झाली असून धातूच्या वस्तू त्याच्या अंगाला चिकटून बसत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील न्यू गुडशेड रोड येथील नर्तकी प्राईड अपार्टमेंटमधील 52 वर्षीय रहिवासी दौलत पाटील यांना हा चुंबकत्वीय अनुभव येत आहे. पाटील यांनी नुकताच कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीराला चुंबकीय शक्ती प्राप्त होते असे सोशल मीडियाद्वारे दौलत पाटील यांना समजले होते. त्यामुळे दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांनी चुंबकत्वाची पडताळणी केली.
ही पडताळणी करताना घरातील चावी, प्लेट, चमचा, पैशाची नाणी आदी धातूच्या वस्तू खरोखर आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर ठेवल्यास त्या चिकटून बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दौलत पाटील यांच्या शरीराला चुंबकाप्रमाणे धातूच्या वस्तू चिकटत असल्याच्या या प्रकाराबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दोघा व्यक्तींच्या शरीराला चुंबकत्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. हा नेमका काय प्रकार आहे? याबद्दल आपण डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचे दौलत पाटील यांनी सांगितले.
कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व निर्माण होत नाही : पीआयबी
न्यू गूडशेड रोड येथील नर्तकी प्राईड अपार्टमेंटमधील दौलत पाटील यांना कोरोना लसीमुळे चुंबकत्वाची सुपर पॉवर प्राप्त झाल्याचा जो दावा केला जात आहे तो तपासणीअंती गेल्या 10 जून रोजीचं प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने असे अनेक दावे (पीआयबी) फेटाळून लावले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस मनुष्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारची चुंबकीय शक्ती निर्माण करू शकत नाही. ही लस अत्यंत सुरक्षित असून त्यामध्ये धातु संबंधित कोणताही अंश नसतो असे पीआयबीच्या तपासणी पथकाने स्पष्ट केले आहे.
#Covid19
#Vaccine
#Covishield
#BelgaumLive
#BelgaumNews
#BelgaumNewsUpdate