नियम भंग करून बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र नियम 2016 नुसार बेळगाव शहर व्याप्तीतील तब्बल 121 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.
शस्त्र धारकांनी आपल्या शस्त्रांच्या परवान्यांचे (आर्म लायसन्स) वेळच्यावेळी नूतनीकरण करून घेतले पाहिजे. परवाना प्राधिकरणाच्या (लायसंसिंग अथॉरिटी) सूचनेनुसार परवाना असलेल्या शस्त्र धारकांनी आपली शस्त्रे सरकार जमा केली पाहिजेत.
परवानाधारकांनी नवी बंदुका आदी शस्त्र आणि दारुगोळा अर्थात बंदुकीच्या गोळ्या खरेदी केल्यानंतर त्या 2 वर्षाच्या आत लायसंसिंग अथॉरिटी समोर सादर केल्या पाहिजेत. शस्त्र परवाना असलेल्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात आपली नांव नोंदणी केली पाहिजे आणि जर घरच्या पत्त्यात कांही बदल असेल तर तो त्वरित कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याला कळविला पाहिजे.
तसेच त्यांनी शस्त्र नियम -2016 मधील सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. बेळगाव शहर व्याप्तीतील 121 शस्त्र धारकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.