विजेच्या खांबालामध्ये शिरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का एका मुलाला बसल्यानंतर गल्लीतील जागरुक नागरिकांनी तो जीवघेणा खांब त्वरित दुरुस्त करून घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याची घटना नार्वेकर गल्ली शहापूर येथे काल रात्री घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शहापूर येथील नार्वेकर गल्ली आणि विठ्ठल देव गल्ली दरम्यान एक ब्रिटिश कालीन विजेचा जुना लोखंडी खांब आहे. आज शनिवारी रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास नार्वेकर गल्लीत रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांपैकी एका मुलाचा या खांबाला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा जोरदार झटका बसला.
मात्र आसपास नागरिक असल्यामुळे संबंधित मुलाचे प्राण थोडक्यात बचावले. दरम्यान नागरिकांनी शहानिशा केली असता त्या विजेच्या खांबालामध्ये विद्युत प्रवाह जाऊन संपूर्ण खांब विद्युतभारित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सध्याच्या पावसाळी वातावरणात सदर विद्युत भारीत थांब जीवघेणा ठरू शकतो हे लक्षात घेऊन नार्वेकर गल्लीतील नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ हेस्काॅम अधिकाऱ्याना दिली.
तेंव्हा हेस्काॅम कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीद्वारे खांबातील विद्युत प्रवाह खंडित केला. याकामी नार्वेकर गल्ली येथील सागर पाटील, विराज मुरकुंबी, पिंटू हदगल, बसवराज जुगळी, विनायक बोंगाळे आदींनी पुढाकार घेतला होता.