कोराना प्रादुर्भावामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्यामुळे उपजीविकेसाठी या प्रादुर्भाव काळात देखील त्यांना पर्याय नोकरी शोधावी लागत आहे. कोरोनाग्रस्तांना त्यांच्या घरी वाळीत टाकल्याप्रमाणे सर्वांपासून वेगळं ठेवलं जातं हे सर्वश्रुत आहे. नातलगांच्या गैरहजेरीत अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी कांहीजणांनी केअरटेकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी ज्यांना सेवाशुश्रुषेचा अनुभव आहे ते सध्या फायदेशीर स्थितीचा असून त्यांची दररोज 400 ते 700 रुपयांपर्यंत कमाई होत आहे.
वसंत सावंत (वय 31) या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या कामगाराला काम बंद झाल्यामुळे आपली नोकरी गमवावी लागली. तथापि त्याचे आजोबा -आजी कांही वर्षे अंथरूणाला खिळून असल्यामुळे त्यांच्या सेवाशुश्रुषेचा त्याला चांगला अनुभव होता. नोकरी गेल्यामुळे मागील वर्षी या नवविवाहित युवकाची आर्थिक कमाई शून्य होती. तेंव्हा त्याने त्याच्याकडे मदत मागण्यास आलेल्या कुटुंबातील कोरोनाग्रस्त व्यक्तीचा केअरटेकर होण्याचा निर्णय घेतला. संबंधित कुटुंबाने विशालला केअरटेकरच्या नोकरीचा दररोज 400 रुपये प्रमाणे पगार दिला.
मला संपूर्ण दिवस 65 वर्षे वयाच्या रुग्णाची देखभाल करावी लागत होती. रुग्णाला वेळच्या वेळी औषध देणे. त्याच्या आरोग्य संबंधीच्या तक्रारी जाणून घेणे. त्या तक्रारींबाबत डॉक्टर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा करणे ही कामे मला करावी लागत होती. सदर रुग्ण पंधरा दिवसांनंतर बरा झाला असला तरी त्याच्या कुटुंबियांनी विनंती केल्यामुळे मी आणखी आठवडाभर त्या रुग्णांची सेवा केली, असे विशाल सावंत याने सांगितले. केअरटेकर म्हणून काम करत असताना स्वतःच्या सुरक्षततेसाठी तो सर्वती खबरदारी घेत होता.
विशाल सावंत याने सुरू केलेल्या या नव्या कामाची माहिती मिळताच अनेक गरजू कुटुंब त्याच्याकडे येऊन आपल्या कुटुंबातील रुग्ण व्यक्तीची काळजी घेण्याचे काम करण्याची विनंती करू लागले आहेत. या पद्धतीने फॅक्टरी कामगार असलेल्या सावंत याचे आता केअरटेकरमध्ये रूपांतर झाले आहे. त्याच्या प्रमाणे अनेक जण सध्या केअरटेकरचे काम करत आहेत.