सध्याच्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि जिल्हा आरोग्य खात्याने बेळगाव शहरातील 58 पैकी बेळगाव उत्तर मधील 6 आणि दक्षिण मधील 6 असे एकूण 12 प्रभाग कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ म्हणून घोषित केले असून या 12 प्रभागांमध्ये सध्या 150 ते 200 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत.
सदर कोरोना हॉटस्पॉट प्रभागांसाठी महापालिकेने विशेष अधिकारी नियुक्त केले असून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी खास उपाययोजना करण्याची सूचना मनपा आयुक्त के. एच. जगदीश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
त्यानुसार प्रभागांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या मदतीने या प्रभागांमध्ये जनजागृती, घरोघरी आरोग्य तपासणी, स्वॅब तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्या बेळगाव शहर आणि तालुका जिल्ह्यातील हॉटस्पॉट बनले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना बाधित सध्या बेळगाव शहरात आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी टास्क कोर्स समिती स्थापन केली आहे. शहरातील ज्या प्रभागात सर्वाधिक अबाधित आहे त्यांची माहिती महापालिका व आरोग्य खात्याने घेतली आहे. यामध्ये 58 पैकी 12 प्रभाग हॉटस्पॉट बनल्याचे उघडकीस आले आहे.
टास्क फोर्स समितीला या 12 प्रभागांमध्ये अधिक सक्षमतेने काम करण्याची सूचना देण्यात आली असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ज्यांच्यात कोरोनाची लक्षण आहेत त्यांची जागेवरच चांचणी केली जात आहे. ज्यांच्यात गंभीर लक्षणे आहे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे.
त्याचप्रमाणे घरात विलगीकरण करण्यात आलेल्यांची दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील संसर्गाची स्थिती गंभीर असून 20 मेपर्यंत आकडेवारी पाहता बेळगाव शहरात 2332 आणि तालुक्यात 755 सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी 2264 घरी उपचार घेत असले तरी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या गेल्या आठवड्यात वाढली आहे.