घरगुती विलगीकरण हे रुग्णाचे कुटुंबीय आणि समाजासाठी धोकादायक ठरू शकते. तेंव्हा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कृपया जे कोरोनाग्रस्त घरांमध्ये विलगीकरणाद्वारे उपचार घेत आहेत, त्या सर्वांनी लवकरात लवकर नजीकच्या कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
तसेच कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट नियंत्रणाखाली आणण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बृहत कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली जात असून 134 वैद्यकीय पथकांद्वारे ही मोहीम राबविली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिली. हुक्केरी येथील कोवीड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामीण भागातील कोरोना तपासणीसाठी नियुक्त 134 वैद्यकीय पथकांमध्ये लॅब टेक्नीशियनसह आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे तालुका व जिल्हास्तरीय अधिकारीदेखील या मोहिमेत सहभागी असतील. एकेका लॅब टेक्नीशियन पथकाकडे 100 रॅपिड अँटीजन टेस्ट किट देण्यात आली आहेत.
ही पथके प्रत्येक खेडेगावातील घराघरात जाऊन ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत अशांची, तसेच नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांचे प्रायमरी कॉन्टॅक्ट असणाऱ्यांची, शिवाय सारी रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची प्राधान्याने रॅपिड अँटीजन टेस्ट घेतील. पॉझिटिव्ह लक्षणे असलेल्यांची आरटी -पीसीआर चांचणी झालीच पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही संपूर्ण जिल्ह्यात केली आहे बेळगाव जिल्ह्यात 1,300 खेडेगांवं आहेत. या सर्व गावांमध्ये ही तपासणी मोहीम राबवली जाणार आहे, असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
राज्य सरकार ‘वैद्याधिकारी निघाले खेड्यांकडे’ हा कार्यक्रम राबवत आहे. त्या कार्यक्रमाचा आमच्या या मोहिमेमध्ये अंतर्भाव असणार आहे असे सांगून हुक्केरी येथील कोविड केअर सेंटर उत्तम आहे. या पद्धतीने कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण सर्वांसाठी सुरक्षित आहे. घरातील विलीनीकरण हे त्या रुग्णाच्या कुटुंबासह समाजासाठी धोकादायक ठरू शकते. तेंव्हा माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, जे कोरोनाग्रस्त घरांमध्ये विलगीकरणाद्वारे उपचार घेत आहेत त्या सर्वांनी लवकरात लवकर नजीकच्या केअर सेंटरमध्ये येऊन दाखल व्हावे, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले.
ग्रामीण भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचा लाभ नागरिकांनी घेऊन स्वतःला सुरक्षित करावे. सध्या जिल्ह्यात नव्याने 100 कोविड केअर सेंटर सुरू करण्याची आमची योजना आहे.
हुक्केरीत सध्या तीन सेंटर सुरू असून आणखी 25 कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. जर लोकांनी प्रतिसाद दिला तर एका दिवसात आम्ही ही केंद्रे सुरू करू शकतो. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती पुढे येऊन अशा सेंटरमध्ये दाखल झाल्यास वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा बसू शकतो, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले.