बेळगाव पोलिसांनी कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्याअंतर्गत बुधवारी तीन गुन्हे दाखल केले असून अनावश्यक फिरणारी 35 वाहने जप्त करण्याबरोबरच विना मास्क फिरणाऱ्या 290 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सुरूच असून कॉलेज रोडवरील ‘देशी चायवाला’ या दुकानाविरुद्ध येथील खडेबाजार पोलीस स्थानकात केडा कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला, तर अनगोळमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी बुधवारी ही माहिती दिली. नियम उल्लंघन करून दुकान उघडे ठेवणाऱ्या ‘देशी चायवाला’ या दुकानाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे टिळकवाडी पोलीसांनी अनगोळ येथे क्रिकेट खेळणाऱ्या एका तरुणाला अटक केली असून त्याच्या अन्य साथीदारांनी पलायन केले. त्यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काल बुधवारी दिवसभरात अनावश्यकपणे फिरणारी 35 वाहने पोलिसांनी जप्त केली असून विना मास्क करणाऱ्या 290 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. बेळगाव शहर व उपनगरात कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्यांतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोना महामारी थोपविण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. अनावश्यकपणे रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.