कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा विचार सुरू केला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास मोठा विलंब होणार असल्यामुळे शिक्षण खात्याची चिंता वाढली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासह शाळा कशा प्रकारे सुरू करता येईल याकडे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करताना शिक्षण खात्याला पूर्ण विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत शाळा सुरू झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन पुस्तके वितरित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे पुस्तके वेळेत उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन पुस्तके वाटप करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक ते पाठही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याच्या शक्यतेकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब झाला तर विद्यार्थ्यांना पुस्तके लवकर वितरित केले जातील. सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असल्यामुळे विविध पर्यायांबाबत विचार सुरू आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी स्पष्ट केले आहे.