Thursday, December 19, 2024

/

अखेर लॉक डाऊनला झाला प्रारंभ!.. रस्ते झाले निर्मनुष्य…

 belgaum

कोरोना संसर्ग हाताबाहेर गेल्याने अपरिहार्य म्हणून राज्य सरकारने आजपासून राज्यभरात जारी केलेल्या या वर्षातील पहिल्या लॉकडाउनची बेळगावात काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. आज सकाळपासून वाहने जप्त करण्याबरोबरच मार्ग सूचीचे पालन होईल या दृष्टिकोनातून पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे सकाळी 10 नंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांची वर्दळ वगळता सर्व रस्ते निर्मनुष्य होऊन शहरात शुकशुकाट पसरला होता.

राज्य सरकारने या आधी 28 एप्रिलपासून जारी केलेला जनता कर्फ्यू कोरोना नियंत्रित करण्यास अपयशी ठरल्याने आजपासून येत्या 24 मेपर्यंत कडक लॉक डाऊनचा आदेश जारी करण्यात आला आहे. पुढील 14 दिवस हा लॉक डाऊनचा आदेश जारी असला तरी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आपापल्या परिसरातील दुकानातून आवश्यक साहित्याची खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मात्र त्यासाठी वाहनांचा वापर करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आला आहे. याबाबत गेल्या एकदोन दिवसांपासून सातत्याने जनजागृती करण्यात येऊन देखील आज सकाळी शहर उपनगरातील बहुसंख्य नागरिक आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्यामुळे कांही ठिकाणी पोलिसांनी वाहनचालकांना चांगली समज देऊन माघारी धाडले तर कांही ठिकाणी कठोर भूमिका घेताना वाहने जप्त केली. टिळकवाडी पहिले रेल्वे गेट तसेच शहर उपनगरातील बऱ्याच ठिकाणी मार्ग सूचीचे पालन न करता अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांना अडवून पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली. तथापि मान्यताप्राप्त ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे असणाऱ्या वाहन चालकांना मात्र रहदारीस अनुमती दिली जात होती. संचार बंदीसाठी शहरातील बहुतांश रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत.Lock down

नागरिकांना आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात आलेला कालावधी समाप्त झाल्यानंतर म्हणजे सकाळी दहानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेताना कांही ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आपल्या लाठीचा प्रसादही दिला. त्याचप्रमाणे प्रमुख रस्त्यांसह गल्लोगल्ली फिरून सुरु असलेली दुकाने बंद करावयास लावली. याप्रसंगी पोलिसांसमवेत महापालिकेचे मार्शल देखील तैनात होते. त्यांनी दुकाने बंद करण्याबरोबरच रस्त्यावर बसून भाजी व फळे-फुले विकणाऱ्या विक्रेत्यांना देखील हटविले.

या पद्धतीने लॉकडाउनच्या कडक अंमलबजावणीला प्रारंभ होताच अल्पावधीत शहर उपनगरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य झाले. नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली आदी परिसरामध्ये शुकशुकाट पसरला होता. हीच परिस्थिती उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर पहावयास मिळाली. चिटपाखरूही नसलेल्या या रस्त्यांवर फक्त पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांचा वावर दिसून येत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.