कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याबरोबरच गावात संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय गावात येणाऱ्या हौशी मंडळींना धडा शिकविण्यासाठी कल्लेहोळ (ता. बेळगाव) गावातील गावकऱ्यांनी एक नामी शक्कल लढविली असून विनापरवाना अकारण गावात येणाऱ्यांना 7 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सध्या बेळगाव ग्रामीण भागात चर्चेचा विषय बनला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कोणीही आपल्या घराबाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनामार्फत सतत करण्यात येत आहे. तरीही अनेकदा हे नियम धाब्यावर बसवून अनेक जण बाहेर फिरताना दिसतात.
अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय गावात येणाऱ्या हौशी मंडळींना धडा शिकविण्यासाठी कल्लेहोळ गावकऱ्यांनी विनापरवाना अकारण गावात येणाऱ्यांना 7 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव ग्रामीण भागातील अनेक गावात गेल्या आठवड्यात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. सरकारी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने कल्लेहोळकरांनी स्वतःची काळजी स्वतःच घेण्यास सुरुवात केली आहे. उपचारासाठी अनेक रुग्णांनी आपला मोर्चा खासगी दवाखान्याकडे वळविला आहे. तथापी खासगी दवाखान्यातही बेड्स अनुपलब्ध झाल्याने आता खबरदारी हाच एकमेव उपाय ठरला आहे. त्यामुळे साथीचा आणखी फैलाव होऊ नये यासाठी कल्लेहोळ ग्रामस्थांनी वरीलप्रमाणे कठोर निर्णय घेतला आहे.
कोणाही बाहेरील व्यक्तीला गावांमध्ये येण्यास कडक निर्बंध घालण्यात आले आहेत या नियमाचे उल्लंघन करून कोणी गावात आल्यास 7000 रुपये दंड आकारणी केली जाणार आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी विविध फंडे अवलंबिले जात आहेत. या कालावधीत कोणी पाहुणे व नातेवाईकांना गावात बोलविल्यास त्यांनाही दंड आकारण्याचा निर्णय ग्राम दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.