कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाचं कंबरडं मोडलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट किती दिवस राहील असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते कोरोनाची ही दुसरी लाट 100 दिवस राहणार आहे. जोपर्यंत 70 टक्के लोकांचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाची लहर राहील. लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटी, संसर्गजन्य आजारांविरोधात अप्रत्यक्षपणे बचाव होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Second wave of coronavirus can last up to 100 days: Expert)
लोकांना मोठ्या प्रमाणावर लस दिल्यानंतर किंवा संसर्गातून बाहेर पडल्यानंतर इम्युनिटी विकसित होते. समूहाच्या या इम्युनिटीला हर्ड इम्युनिटी म्हणतात, असं तज्ज्ञांनी सांगितलं
पुन्हा इन्फेक्शन का होतं?
नवा म्युटेटेड व्हायरस अधिक संक्रामक आहे. एक सदस्य प्रभावित झाला तर संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होतो. लहान मुलांनाही त्याची लागण होते. नवा व्हायरस अधिक संक्रामक असल्याने लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोना होतो. नियमितपणे करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर चौकशीतून म्युटेटेड व्हायरसचा पत्ता लागत नाही. कोरोना झालाय याची जाणीव न होणं हाच संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचा संकेत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मास्क लावणं हाच जालीम उपाय
कोरोना व्हायरसची दुसरी लाट 100 दिवस राहू शकते. जोपर्यंत 70 टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत या संसर्गावर नियंत्रण मिळवता येणार नाही. जेव्हा तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात 15 मिनिटं की किंवा त्यापेक्षा अधिक काळ संपर्कात येता तेव्हा कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते. लठ्ठपणा, मधुमेह, क्रोनिक किडनी आजार आदी आजारांच्या व्यक्तिंनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच मास्क लावणं, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हाच कोरोना रोखण्यावर एकमेव उपाय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आढळणारा कोरोनाचा नवीन विषाणू सार्सकोव्ह-2 पासूनच (Sarscove-2) म्युटेट झाला आहे. आतापर्यंत या विषाणूचे अनेक प्रकार आले असून, ते अधिक शक्तिशाली आहेत. नवीन रूपातील काही विषाणू जीवघेणे आहेत तर काही संसर्ग वेगानं पसरवण्यासाठी सक्षम असून त्याचा परिणाम पूर्वीच्या विषाणूसारखाच आहे. गेल्या एका वर्षात कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्येही फरक पडला आहे.
हा कोणता प्रकार आहे?
कोरोना संसर्गाच्या या दुसर्या लाटेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारात नवीन काय आहे, याबाबत तज्ज्ञांचं मत असं आहे की, नवीन कोरोना विषाणू हा ब्राझील (Brazil) आणि केंटचा एक प्रकार आहे. हा विषाणू अधिक लक्षणं दाखवतो
नवीन लक्षणे कोणती आहेत?
नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास अडचण इत्यादी पूर्वीच्या लक्षणांसह पोटात दुखणं, उलट्या होणं, मळमळणं, सर्दी अशी लक्षणंही दिसत आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची अशी सामान्य लक्षणंदेखील दिसत नाहीत.
रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे
कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून बरेच डॉक्टर आता लोकांना संपूर्ण लक्षणं दिसत नसली तरीही कोविड चाचणी करून घेण्याचा सल्ला देत आहेत. कारण बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणं दिसत आहेत.
मात्र आताचा विषाणू अधिक घातक असल्यानं गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अधिक आवश्यकता भासत आहे.
यंत्रणेवर दुहेरी ताण
अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर (Health System) दुहेरी ताण पडत आहे. एकीकडे चाचणी करणार्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं रहात आहे. डॉक्टरांना फुफ्फुसे, श्वसन प्रणाली, पोट इत्यादीसारख्या अनेक तक्रारींवर उपचार कारावे लागत आहेत.
पोटाच्या तक्रारी वाढत आहेत
या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पोटदुखी (Stomach ache) हे लक्षण आढळून येत आहे. पूर्वीपेक्षा आता ही तक्रार जास्त रुग्ण करत आहेत. डॉक्टरांच्या मते हा नवीन विषाणू फुफ्फुसांशिवाय आता पचन यंत्रणेवरदेखील आघात करत आहे. आता कोविड रुग्णांमध्ये अतिसार, पोटदुखी, उलट्या, मळमळ यासारख्या पोटाशी संबंधित तक्रारी सामान्य झाल्या आहेत.
वाढता व्हायरल लोड
रुग्णाच्या रक्तातील सार्स कोव्ह -2 चे प्रमाण व्हायरल लोड (Viral Load) दर्शवतं. कोविड-19 च्या चाचणीत याचीच तपासणी केली जाते. व्हायरल लोड अधिक असण्याची अनेक कारणं असू शकतात. परंतु बहुतांश वेळा विषाणूचं प्रमाण अधिक असल्यानेच हा लोड वाढल्याचं स्पष्ट होतं. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये व्हायरल लोडचे प्रमाण अधिक आढळून येत आहे.
– डॉ सोनाली सरनोबत- बेळगाव