Tuesday, December 24, 2024

/

सतीश जारकीहोळी यांची मुसंडी : मंगला अंगडी यांना टाकले मागे

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पिछाडीवरून मुसंडी मारत मतमोजणीच्या 50 व्या फेरीअंती काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या मंगला अंगडी यांना मागे टाकत त्यांच्यावर जवळपास 10 हजार मतांनी आघाडी मिळविली आहे.

टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणी मध्ये सध्या भाजप उमेदवार मंगला अंगडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या अटीतटीची लढत सुरू आहे. मतमोजणीमध्ये प्रारंभापासून दुपारी 1 वाजेपर्यंत भाजपच्या मंगला अंगडी सर्वात आघाडीवर होत्या. मात्र त्यानंतर काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या खात्यातील मतांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि 42 व्या फेरीअंती जारकीहोळी यांनी अंगडी यांना मागे टाकून 4302 मतांहून अधिक मतांची आघाडी मिळवली. आपली ही आघाडी त्यानंतर आबाधित राखणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी मतमोजणीच्या 84 पैकी 50व्या फेरीअंती 10,025 मतांनी आपली आघाडी वाढविली होती. मतमोजणीच्या 50 व्या फेरीअंती सतीश जारकीहोळी यांना 2,42,079 मते, मंगला अंगडी यांना 2,52,104 मते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 81,950 मते पडली होती.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये आज दुपारपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मंगला अंगडी (भाजप), सतीश जारकीहोळी (काँग्रेस) आणि शुभम शेळके (म.ए. समिती) या प्रमुख उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
अरभावी मतदार संघ : 45 व्या फेरीअंती मंगला अंगडी 3110 मते, सतीश जारकीहोळी 3669 मते, शुभम शेळके 243 मते. गोकाक मतदार संघ : 46 व्या फेरीअंती मंगला अंगडी 40036, सतीश जारकीहोळी 32889, शुभम शेळके 234. बेळगाव उत्तर मतदारसंघ : 48 व्या फेरीअंती मंगला अंगडी 20834, सतीश जारकीहोळी 29192, शुभम शेळके 12706. बेळगाव दक्षिण मतदारसंघ : 50व्या फेरीअंती मंगला अंगडी 30257, सतीश जारकीहोळी 18388, शुभम शेळके 27722. बेळगाव ग्रामीण मतदार संघ : 45 व्या फेरीअंती मंगला अंगडी 19120, सतीश जारकीहोळी 22802, शुभम शेळके 35280. बैलहोंगल मतदार संघ : 35व्या फेरीअंती मंगला अंगडी 25142, सतीश जारकीहोळी 25865, शुभम शेळके 144. सौंदत्ती मतदारसंघ : 48व्या फेरीअंती मंगला अंगडी 34158, सतीश जारकीहोळी 44276, शुभम शेळके 2802. रामदुर्ग मतदार संघ : 47 व्या फेरीअंती मंगला अंगडी 36967 मते, सतीश जारकीहोळी 37240 मते आणि शुभम शेळके 2784 मते. एकंदर मंगला अंगडी (भाजप) आणि सतीश जारकीहोळी (काँग्रेस) या दोन्ही उमेदवारांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू असल्यामुळे मतमोजणीच्या 84 फेऱ्यानंतर विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.