बेळगाव एअरपोर्ट रोडच्या एंट्रन्सला सांबरा गावाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी कचऱ्याच्या पिशव्या आणि टाकाऊ साहित्य फेकण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव एअरपोर्ट रोडच्या एंट्रन्सला सांबरा गावाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी सध्या केरकचरा, टाकाऊ साहित्यासह टाकाऊ अन्न व कचरा भरलेल्या पिशव्यांचा ढिगारा साचला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पडून असलेल्या या कचर्याच्या ढिगार्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे याठिकाणी रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. या कचराकडे बेळगाव महापालिकेसह सांबरा ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांसह विशेष करून सांबरा गावाच्या महादेवनगर परिसरात हवाईदलाची जी मंडळी भाड्याने घरे घेऊन राहतात त्यांच्याकडूनच मुख्य रस्त्याशेजारी हा कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याचा आरोप आहे.
बेळगावला मंत्री वगैरे एखादी मान्यवर व्यक्ती येणार असेल त्यावेळी फक्त रस्त्याशेजारीला सदर कचर्याचा ढिगारा हटविला जातो. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्यामुळे या रस्त्यावरून नेहमी ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मुख्य रस्त्याशेजारी अशाप्रकारे कचरा टाकण्यास निर्बंध घातला जाऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची व्यवस्था केली जावी अथवा सदर कचर्याचा ढिगारा वेळच्यावेळी हटविला जावा, अशी जोरदार मागणीही केली जात आहे.