लॉक डाउन काळामध्ये रेशन दुकानदारांना वाहनावरून ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी दुकानदारांनी स्वतःचे ओळखपत्र तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिलेले ओळखपत्र पोलिसांना दाखवावे, असे पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांनी स्पष्ट केले आहे
राज्यात आज सकाळपासून जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊन दरम्यान सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी वाहनांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. त्यानुसार रेशन दुकाने देखील सुरू राहणार असून रेशन वाटप होणार आहे. मात्र पोलिसांकडून रेशन दुकानदारांची वाहने अडविण्याची शक्यता गृहीत धरून रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश तलवार यांनी काल रविवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी रेशन दुकानदारांना दुकानापर्यंत ये-जा करण्यासाठी वाहनाची सवलत दिली जावी अशी मागणी तलवार यांनी केली होती. सदर मागणी मान्य करून पोलीस आयुक्तांनी रेशन दुकानदारांना त्यांच्या ओळखपत्रासह अन्न व नागरी पुरवठा खात्याचे ओळखपत्र दाखवून वाहनावरून ये-जा करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी सकाळी 6 ते 10 या वेळेत दुकानातून रेशन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र वाहन घेऊन जाण्यास परवानगी नसल्यामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेशन दुकानातून मिळणारा शिधा घरापर्यंत आणावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बीपीएल शिधापत्रिकाधारकांना अतिरिक्त तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे जर पाच सदस्यांचे कुटुंब असल्यास त्या शिधापत्रिकाधारकांना 50 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. मात्र 50 किलो तांदळाचे पोते घरापर्यंत आणायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. कारण आजपासून अत्यावश्यक सेवेत शिवाय कोणीही आपली वाहने बाहेर आणू नयेत अन्यथा वाहने जप्त करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. परिणामी शिधापत्रिकाधारकांची मोठी गोची झाली आहे.