कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत चालल्याने कडक नियमावली लागू करण्याबरोबरच आता रेशन दुकानदारांना यापुढे रेशन देताना रेशन कार्डधारकांचे बायोमेट्रिक न घेण्याची सूचना करण्यात आली असून तसा आदेश राज्य सरकारने नुकताच बजावला आहे.
बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) पद्धत सुरू ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे रेशन कार्डधारकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी कोणत्याही रेशन कार्डधारकाकडून बायोमेट्रिक न घेता मोबाईल ओटीपी किंवा चेक लिस्ट (नांवाची यादी) नुसार आहार धान्याचे वाटप करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. कोरोनामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मागील वर्षी देखील अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून रेशन दुकानातील बायोमेट्रिक पद्धत बंद करण्यात आली होती. मात्र संसर्ग कांही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर कांही महिने पुन्हा ही पद्धत सुरू करण्यात आली होती. परंतु आता एप्रिलपासून कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरू लागल्याने राज्य सरकारने पुन्हा कडक मार्गसूची जाहीर केली आहे.
रेशन दुकानात शेकडो रेशन कार्डधारक धान्य घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या सर्वांचे अंगठ्याचे ठसे घेणे धोकादायक असून यापुढे मोबाईल ओटीपीनुसार आहार धान्याचे वाटप करावे. तसेच दिव्यांग, वयोवृद्ध आणि आजारी असणाऱ्या रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास प्राधान्य देण्यात यावे.
राज्यातील तसेच अन्य राज्यातील रेशनकार्डधारकांनाही पोर्टेबिलिटीनुसार धान्यांचे वितरण करावे. धान्य वितरणावेळी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना रेशन दुकानदारांना करण्यात आली आहे.