Friday, December 20, 2024

/

खाजगी हॉस्पिटल्स करत आहेत रुग्णांची लुबाडणूक?

 belgaum

वॉशिंग्टन पोस्ट या जगप्रसिद्ध वृत्तपत्राचे पत्रकार देसिकान तिरूनारायणपुरम यांचे 79 वर्षीय सासरे भालचंद्र होनावर यांच्या बुधवारी बेळगावच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये झालेल्या निधनाने साऱ्या उत्तर कर्नाटकाचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण हॉस्पिटल व्यवस्थापनाने भालचंद्र कोरोनाग्रस्त होते असे सांगितले असले तरी त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने झाल्याचे बोलले जात आहे.

मयत भालचंद्र यांचा मुलगा अश्विन होनावर यांनी ज्या कसबेकर मेटगुड हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांना दाखल केले होते, त्यांनी कोरोना निदानासाठी कराव्या लागलेल्या सिटीस्कॅनचा रिपोर्ट आम्हाला दाखवलेला नाही. माझ्या वडिलांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे नव्हती असे स्पष्ट केले आहे. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. हेमंत कौजलगी माझ्या वडिलांवर उपचार करत होते आणि त्यांना पहिले कांही दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर आमच्या विनंतीवरून त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये हलविण्यात आले. स्पेशल वाॅर्डसाठी आमच्याकडून प्रतिदिन 16000 रुपये आकारले जात होते, अशी माहितीही अश्विनी यांनी दिली.

सर्व कांही व्यवस्थित असताना अचानक ‘तुमच्या वडिलांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे’ असे जेंव्हा मला आणि आमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना सांगण्यात आले, त्यावेळी आम्हा सर्वांना धक्काच बसला. तसेच बुधवारी सायंकाळी त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध असणाऱ्या अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात सांगण्यात आले. मात्र इतर कोणतेही हॉस्पिटल त्यांना दाखल करून घेण्यास तयार नसल्यामुळे अखेर त्यांचे निधन झाले, असे अश्विनी यांनी सांगितले.

Hospital file pic
Hospital file pic

डॉ. कौजलगी यांनी भालचंद्र यांना पडल्यामुळे पाठीला दुखापत झाली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यासाठी आम्ही त्यांच्या छातीचा एक्स-रे काढण्यास सुचविले आणि तेंव्हा त्यांच्या छातीवर आम्हाला डाग दिसून आल्याचे सांगितले. आम्ही डॉ. सत्यगिरी या दुसऱ्या डॉक्टरांकडे त्यांच्या उपचाराची जबाबदारी सोपविली. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असली तरी आम्हाला कोरोनाची शंका असल्यामुळे त्यांची एचआरसिटीस्कॅन तपासणी करण्याचा सल्ला मी दिला. ही तपासणी रविवारी झाली आणि तपासणी अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तेंव्हा आम्ही त्यांचे विलगीकरण करून संसर्ग निर्मूलनासाठी उपचार सुरू केले. तथापि आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत असताना श्वसनात अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, असे स्पष्टीकरण कौजलगी यांनी दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलच्या प्रशासक रुपा तलवार यांनी भालचंद्र यांची आरटी -पीसीआर चांचणी झाली नव्हती. तथापि कोविड -19 पॅकेजसाठी तसे बिल बनवण्यात आल्याचे सांगितले.

या पद्धतीने सध्या बेळगावसह कलबुर्गी, रायचूर आणि बागलकोट जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल्सकडून उपचारासाठी अव्वाच्या सव्वा बिल आकारली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत राज्यात सर्वत्र उपचारासाठी अंदाधुंद पैसे उकळले जात असल्याचे एका आयएएस अधिकाऱ्यांनी सांगितले. कांही खाजगी हॉस्पिटल्सकडून बेड्सचा कृत्रिम तुटवडाही निर्माण केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भालचंद्र यांच्या निधनाबद्दल आपण चौकशीचे आदेश देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.