ऑक्सिजन अभावी अनेक कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागत असल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या सरकारने ऑक्सीजन साठ्याची रोजच्यारोज माहिती नोडल अधिकाऱ्यांना द्यावी. तसेच फक्त हॉस्पिटल्स आणि कोवीड सेंटरनाच ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करावा, अशी सक्त सूचना ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांना दिली आहे.
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला असून ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे, शिवाय बऱ्याच जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे जागे झालेल्या सरकारने तातडीने पत्रक जारी करून राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांच्या कंपनीत तयार होणारा ऑक्सिजन पूर्णपणे रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत इतर कंपन्यांना वा संस्थांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. यापुढे रोजच्या रोज किती ऑक्सिजन तयार करण्यात आला. तसेच किती रुग्णालयांना त्याचा पुरवठा करण्यात आला, याची माहिती नोडल अधिकारी व प्रशासनाला देण्याची सूचना करण्यात आली आहे.
ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांमध्ये दररोज किती प्रमाणात ऑक्सिजन शिल्लक राहत आहे. त्यानुसार ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. एकंदर आता यापुढे दिवसभरात किती ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला? दिवसभरात किती ऑक्सिजन शिल्लक आहे? याची माहिती संबंधित कंपन्यांना रोजच्यारोज नोडल अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे फक्त हॉस्पिटल्स आणि कोवीड सेंटरनाच ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करावा लागणार आहे.