रोटरी क्लब ऑफ बेळगावने येळ्ळूर रोड येथील केएलई सेंटिनरी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सहयोगाने सुरू केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा उद्घाटन समारंभ आज सोमवारी उत्साहात पार पडला. आता या बँकेव्दारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भाडेतत्त्वावर रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत.
येळ्ळूर रोड येथील केएलई सेंटिनरी चॅरिटेबल हॉस्पिटल येथे आज सोमवारी आयोजित या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार आणि केएलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे उपस्थित होते. प्रारंभी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ कान्होबा केळुसकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
त्यानंतर प्रभाकर राव कोरे यांच्या हस्ते फीत कापून बँकेचे उद्घाटन करण्यात आले. रो. संजय कुलकर्णी, पराग भंडारे व डॉ. उडचणकर यांनी या सुविधेची प्रक्रिया आणि खरेदीबद्दल माहिती दिली. उद्घाटनाप्रसंगी डॉ. एच. बी. राजशेखर आणि डॉ. धारवाड हे उपस्थित होते. त्यांनी काळाची गरज ओळखून रोटरीने केलेल्या सहकार्याबद्दल रोटरीला धन्यवाद दिले. कार्यक्रमास रोटरीचे माजी अध्यक्ष शरद पै यांच्यासह रोटरीचे अन्य पदाधिकारी सदस्य आणि हॉस्पिटलचा अधिकारी व कर्मचारीवर्ग हितचिंतक उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ बेळगावने केएलई सेंटिनरी चॅरिटेबल हॉस्पिटलला अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे 25 कॉन्सन्ट्रेटर्स देणगीदाखल दिले आहेत. केएलई हॉस्पिटल सदर कॉन्सन्ट्रेटर्स जनतेसाठी भाडेतत्त्वावर देणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. डॉक्टरांचा सल्ला असेल तरच गरजूंना कांही नियम व अटींवर हे कॉन्सन्ट्रेटर भाड्याने दिले जाणार आहेत. मात्र तत्पूर्वी संबंधितांना आधार कार्ड अथवा मतदार ओळखपत्र सादर करावे लागेल. कॉन्सन्ट्रेटर्सची सुरक्षितता ही पूर्णतः रुग्णांची जबाबदारी असणार आहे. त्यांना अन्य कुणालाही हे कॉन्सन्ट्रेटर्स देता येणार नाहीत. रुग्णाने कॉन्सन्ट्रेटर परत केल्यानंतर ते पूर्णपणे सॅनिटाईझ करण्यात येतील.
रोटरीचा हा प्रकल्प रोटरी फाऊंडेशनच्या ग्रँटमधून राबवला जात असून त्यासाठी चिंगारी ॲप, बीईंग ह्युमन, द सलमान खान फौंडेशन आणि रोटरीच्या अन्य क्लबच्या सदस्यांचे सहाय्य लाभले आहे. त्यासाठी रोटरीचे माजी अध्यक्ष शरद पै यांनी पुढाकार घेतला असून केवळ बेळगाव मध्येच नव्हे तर रोटरीच्या 3170 अंतर्गत येणाऱ्या सर्व क्लबतर्फे पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथेही हा उपक्रम सुरू होत आहेत.
प्रांतपाल संग्राम पाटील यांनी या उपक्रमासाठी 5 लाख रुपये मंजूर केले आहेत. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डिस्ट्रिक्ट 3170 चा डिस्ट्रिक्ट ग्रँट, लक्ष्मीकांत नेतलकर यांच्यामार्फत सेंट पॉल्स शाळेची 1987 ची बॅच, प्रताप नलावडे यांच्यामार्फत फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन शिकागो, डॉ. सचिन माऊली, डॉ. आनंद भादवणकर, मनीष शानभाग विजयकांत डेरी, डॉ. संतोष पाटील, प्रमोद भिसे, मुकुंदराव बांदेकर, डॉ. अर्चना जोशी, दिपाली कित्तूर, रो. रुद्र कुमार हालपण्णावर, किरण नाईक, डॉ. व्ही. एन. देसाई, रो. सुनीष मेत्राणी, डॉ. किरण अगाडी, रो. ओम भंडारी आणि रो. बसवराज विभूती यांनी देणगी दिली आहे.