कडक लाॅक डाऊन नियमामुळे पोलिसानी अडविलेल्या विजापूरहुन गोव्याला जाणाऱ्या एका कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पांडू पाटील यांनी मदतीचा हात दिल्याची घटना आज सकाळी घडली.
आज सकाळी विजापूरहून गोव्याला जाणाऱ्या सलीम यलगार व त्यांच्या कुटूंबाला पोलिसांनी कडक लॉकलडाऊन नियमामुळे बेळगावमध्ये कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे अडविले. कार गाडीतून गोव्याकडे निघालेल्या यलगार कुटुंबाला पोलिसांनी परत विजापूरला जायला सांगितले.
मात्र बेळगावातून पुन्हा विजापूरला जायच पण कठीण झालं होत. तेंव्हा त्यांनी गोव्यातील बेळगावच्या सागर पाटील यांना पोलिसांनी अडविल्याची माहिती दिली.
सागर पाटील यांनी मग सामाजिक कार्यकर्ते व वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली.
पाटील यांनी त्वरित चन्नम्मा सर्कल येथे धाव घेऊन त्या परिवाराची चौकशी केली. तसेच दोन दिवस कडक लाॅक डाऊन असल्यामुळे यलगार कुटुंबाची दोन दिवसासाठी आपल्या ऑटोनगर येथील निवासस्थानी राहायची व्यवस्था केली. या मदतीबद्दल समीर यलगार आणि त्यांच्या कुटुंबाने विठ्ठल पाटील यांचे आभार मानले आहेत.