राज्यातील घरगुती विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचे सूतोवाच गेल्या शनिवारी आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी केले असताना बेळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एका घरात एकच व्यक्ती आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे.
याआधी एका घरात एकापेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असतील तर त्या सर्वांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत होते. परंतु यामुळे संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिका प्रशासन व आरोग्य खात्याने एका घरात एकच व्यक्ती आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू करताना एका घरात एकच व्यक्ती आयसोलेशनमध्ये ठेवून उर्वरित सर्वांना कोविंड केअर सेंटर मध्ये ठेवले जात आहे. यामुळे बेळगाव शहरातील महापालिकेच्या सुभाषनगर येथील कोविड केअर सेंटरमधील बाधितांची संख्या वाढली आहे.
नव्या नियमानुसार एकाच घरात किंवा परिसरात पाच अथवा त्यापेक्षा जास्त बाधित सापडले तर तो परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. बाधितांच्या प्रथम संपर्कात आलेल्यांना सात दिवस होम काॅरंटाइन केले जाते. मात्र यामुळे एकाच घरातील अनेक जण बाधित झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. परिणामी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे आता बाधितांपैकी एक जण घरी आयसोलेशनमध्ये राहील, तर उर्वरित सर्वांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल.
या नव्या निर्णयामुळे महापालिका कोविड केअर सेंटरमधील बेड अपुरे पडू शकतात. त्यामुळे आणखी दोन नवी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. सध्या सुभाषनगर व कुमारस्वामी ले-आउट येथे कोविड केअर सेंटर आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून 300 बेड्स उपलब्ध आहेत. भविष्यात बाधितांची संख्या वाढली तर आणखी दोन नवी सेंटर्स सुरू केले जाणार आहेत.