अपार्टमेंटमधील लोकांनी कोरोनाच्या संशयामुळे अपार्टमेंटमधून बाहेर काढल्यामुळे असहाय्य बनलेल्या वृद्ध वॉचमन दाम्पत्याला आज हेल्प फाॅर निडी संघटनेने आधार देऊन आजारी वृद्धाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
याबाबतची माहिती अशी की, महादेव देवण (वय 70) आणि शांता देवाण (वय 65) हे दोघे वृद्ध पती-पत्नी राधेकृष्ण मार्ग, तिसरा क्रॉस, हिंदवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनचे काम करत होते. गेल्या कांही दिवसापासून खोकत असलेले महादेव हे आजारपणामुळे अशक्त झाले होते. शांता यांना देखील खोकला झाला होता.
त्यामुळे हे दोघे वृद्ध पती-पत्नी आज सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन आपली प्रकृती तपासून घेऊन आले. वैद्यकीय तपासणीत त्यांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि सदर आजारी वृद्ध दाम्पत्य आपल्या अपार्टमेंटकडे येताच अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्यांना कोरोना झाल्याचे समजून अपार्टमेंटमध्ये राहण्यास विरोध केला.
याबाबतची माहिती पर्यावरण कार्यकर्ते किरण निप्पाणीकर यांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना दिली. सदर माहिती मिळताच अनगोळकर यांनी आज दुपारी तात्काळ हिंदवाडी येथे धाव घेऊन त्या असहाय्य वृद्ध दाम्पत्याची विचारपूस केली.
तसेच वृद्ध महादेव देवण यांना आपल्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेऊन उपचारासाठी दाखल केले. सुरेंद्र अनगोळकर यांनी केलेली मदत व दिलेल्या आधारामुळे वृद्ध देवण दांपत्य त्यांना दुवा देत आहे.