Monday, December 30, 2024

/

शहरात ‘ऑटो ॲम्ब्युलन्स’ सुरू करा

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत शहरात ॲम्ब्युलन्सची कमतरता भासत असून ही कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाने ऑटोरिक्षाचा पर्याय अवलंबावा आणि ‘ऑटो ॲम्बुलन्स’ सुरू कराव्यात, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी व्यक्त केले.

हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याची हातोटी आणि गरजू रुग्णांना तत्परतेने रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य यामुळे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर हे ‘मिशन मॅन’ किंवा ‘ब्लड मॅन’ म्हणून ओळखले जातात. सध्याच्या कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे, अनेकांचे प्राण वाचवले आहेत. बेळगाव लाईव्हने त्यांचे एकंदर कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. फेसबुक फ्रेंड्स सर्कल बेळगावची 9 वर्षांपूर्वी स्थापना झाल्याचे सांगून संतोष दरेकर म्हणाले की, आमच्या सामाजिक कार्याची सुरुवात आम्ही रक्तदानापासून केली. आजतागायत आम्ही 1653 लोकांचे प्राण वाचविले आहेत. त्याचप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव काळात 154 रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देऊन जीवन दान दिल्याचे सांगून गरजू रुग्णांना रक्ताची मदत पोहोचविण्याच्या प्रक्रियेची दरेकर यांनी माहिती दिली.

गरजू रुग्णांच्या नातलगांनी केलेले फोन किंवा सोशल मीडियावर रक्ताच्या गरजे संदर्भात टाकलेल्या पोस्टची दखल घेऊन आम्ही रक्तदानाचे कार्य पार पडतो. मात्र तत्पूर्वी रक्तदाता वेळेवर मिळेलच याची खात्री नसल्यामुळे आम्ही संबंधितांना इतरत्रही प्रयत्न करा असा सल्ला देतो. कारण एका रुग्णासाठी असो किंवा चार रुग्णांसाठी रक्तदाता मिळवण्यासाठी बरेच फोन कॉल्स करावे लागतात. यासाठी आमच्याकडील रक्तदात्यांच्या यादीतील फोन नंबर आम्ही 8 -10 जण विभागून घेतो आणि सर्व फोन कॉल्स होईपर्यंत मी आणि माझे सहकारी हॉस्पिटलपर्यंत पोचलेलो असतो. दरम्यान रक्तदात्याची व्यवस्था झालेली असते, असे संतोष दरेकर यांनी रक्तदान प्रक्रियेबद्दल सांगितले.

सध्या लाॅक डाऊनच्या काळात मात्र रक्ताची मदत करण्याचे कार्य अवघड बनले आहे. प्लाझ्मा किंवा एसडीपी (सिंगल डोनर प्लेटलेट) मिळणे कठीण झाले आहे. कारण लोक कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी हॉस्पिटलमध्ये विशेष करून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करण्यास कचरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.Darekar

आपल्या अन्नदानाच्या उपक्रमाबद्दल माहिती देताना 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्याचा हेतूने दर महिन्याच्या 14 तारखेला आम्ही गरजूंना अन्नधान्याचे मोफत वाटप करतो. आता कोरोना काळात तर हा उपक्रम आम्ही दररोज राबवत आहोत असे दरेकर यांनी सांगितले. गरीब गरजू लोकांसह अन्नदानाचा उपक्रम राबविणाऱ्या शहरातील गरजू एनजीओंना देखील फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून मी अन्नधान्य किंवा भाजीपाल्याची मदत करत असतो असे सांगून नुकतेच शिवाजीनगर येथील मोफत अन्न वाटप करणाऱ्या एका संघटनेला 16 पोती सोनामसुरी तांदुळ दिल्याची माहिती त्यांनी दिली. याखेरीज लॉकडाउनच्या काळात रेल्वे प्रवाशांचे पोटाचे हाल होत असल्याने निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेतील प्रवासी विशेष करून जनरल कंपार्टमेंटमधील गरजू प्रवाशांसाठी आम्ही मोफत भोजन उपक्रम सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत सध्या शहरात ॲम्ब्युलन्सची कमतरता भासत आहे. शिवाय सरकारने ॲम्बुलन्सचा दर निश्चित केला असला तरी बऱ्याच जणांना तो दरही परवडणारा नसतो. ॲम्बुलन्ससाठी दीड-दोन हजार रुपये मोजण्यापेक्षा त्यांना ऑटो रिक्षाचे 200 रुपये भाडे परवडू शकते. या बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने ऑटोरिक्षाचा पर्याय देखील अवलंबावा आणि ऑटो ॲम्बुलन्स सुरू कराव्यात.

शहरातील ठिकठिकाणच्या मोक्याच्या जागी ही ऑटो ॲम्बुलन्स सेवा जनतेसाठी उपलब्ध करून द्यावी, असे मत व्यक्त करून तुमच्या आजूबाजूची एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल असेल तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांना योग्य ती खबरदारी घेऊन जमेल तशी मदत करा. दुसरी गोष्ट घरात रहा, सुरक्षित रहा. आसपासच्या लोकांमध्ये कोरोना नियमांबाबत जागृती निर्माण करा, असा संदेश शेवटी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी बेळगाववासियांना दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.